धोत्रेवाडीतील आदिवासी तरुणीची आत्महत्या नव्हे तर हत्या!

आरोपी अटकेत
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील धोत्रेवाडी येथील आदिवासी तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याबद्दल अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केल्यांनतर त्या १६ वर्षीय आदिवासी तरुणीने आत्महत्या केली नसून तिचा गळा दाबून खून झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तरुणीचा खून झाला असल्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी गळा दाबून ठार करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत मधील धोत्रेवाडी मधील आदिवासी तरुणी पिंकी गणेश मांगे या तरुणीचा मृतदेह १८ एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा गावाबाहेर ५०० मीटर अंतरावर असलेल्या झाडाखाली आढळून आला होता. कर्जत पोलिसांनी गुन्ह्याचा तपास प्राथमिक पातळीवर असल्याने पिंकी मांगे हिच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली होती. मात्र गुन्ह्याचा तपास करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक यांनी सखोल चौकशी करून हा गळफास नसून त्या मुलीचा खून झाला आहे असे वस्तुस्थितीजन्य पुरावे लक्षात घेऊन पिंकी मांगे हिच्या मृत्यू प्रकरणी गावातील अर्जुन गजानन मांगे या तरुणाला अटक करून त्याच्यावर पिंकी मांगे हीच गळा दाबून खून केला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

धोत्रेवाडी येथील अर्जुन गजानन मांगे आणि पिंकी गणेश मांगे हे नात्याने बहीण भाऊ असलेल्या या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. त्यातून १८ एप्रिल रोजी दुपारी पिंकी आणि अर्जुन यांच्यात बाचाबाची झाली आणि शेवटी अर्जुन याने पिंकी मांगे हीच गळा दाबला आणि तिचा खून केला व ही आत्महत्या आहे असे भासवण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवला. पोलिसांनी गजानन मांगे आणि अर्जुन मांगे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्या दोघांच्या चौकशीतून सदर तरुणीच्या मृत्यूबद्दलचे सत्य बाहेर आले. दरम्यान, पिंकी गणेश मांगे हिचा खून केल्याप्रकरणीअर्जुन गजानन मांगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्जत पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

Exit mobile version