चरी संपामुळेच राज्यात कुळ कायदा लागू; आमदार जयंत पाटील यांचे प्रतिपादन

| भाकरवड | वार्ताहर |
चरी येथील शेतकर्‍यांच्या संपाला स्व.नारायण नागू पाटील आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कणखर नेतृत्व लाभले. त्यामुळे राज्यात कुळ कायदा अस्तित्वात आला, असे प्रशंसोद्गार शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांनी शनिवारी (27 नोव्हेंबर) चरी येथे काढले. चरी शेतकरी संपाच्या 88 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंच नीलम पाटील अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार पंडित पाटील, जि.प. सदस्या भावना पाटील, जि.प.गटनेते अ‍ॅड.आस्वाद पाटील,पं.स.सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती मीनल माळी, सदस्य प्रकाश पाटील,उपसरपंच अभय पाटील, ग्रा.पं. सदस्य महेंद्र ठाकूर, विजय ठाकूर, रोहित जाधव, तेजश्री ठाकूर, शुभांगी पाटील, भारती पाटील, दीपक थळे, चरी, कोपर, कोपरपाडा ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ.जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून चरी संपाची माहिती दिली. या संपामुळे कसेल त्याची जमीन हा नैसर्गिक न्यायानुसार अंमलात आणणारा कुळ कायदा संमत झाला. त्या चरी संपाला स्व नारायण नागु पाटील, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावशाली नेतृत्वाने हे सारे घडवून आणले. त्या संपाच्या स्मृती जागविण्यासाठी दरवर्षी आपण सारे एकत्र येतो, असे ते म्हणाले.

आपण कसत असलेल्या जमिनीची मालकी त्यावेळी खोत सावकारांकडे होती आणि आपली पूर्वज केवळ वेट बिगार म्हणून राबत होती त्या शोषण व्यवस्थेविरुद्ध आपल्या समाजातील एक लढवय्या नेता स्व. नारायण नागु पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी शेतकर्‍यांना संघटीत करून आपल्या हक्कासाठी जागृत केले आणि 1932 ते 1939 अशी सात वर्षे शेतकर्‍यांनी सावकारांच्या जमिनी ओसाड टाकल्या. आप्पासाहेब यांच्याबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाई चित्रे ,चंद्रकांत अधिकारी, श्यामराव परुळेकर, सुलभा नाना टिपणीस , खांद्याला खांदा लावून नेतृत्व करीत होते. या आंदोलनाचे लोण उरण तालुक्यातील भेंडखळ, जसखार येथे पोचले. त्या संपामुळे कुळ कायदा अस्तित्वात आला आणि स्वतंत्र नंतर कसेल त्याची जमीन हे तत्व प्रस्तापित झाले आणि आपण जमिनीचे मालक झालो आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगीतले. चरी संपाला 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून 2009 साली लोकनेते स्व. दत्ता पाटील यांच्या नेतृत्वाने व मान्यवरांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव साजरा केला. त्यावेळी चरी शेतकर्‍यांना संपाची आठवण म्हणून चरी ग्रामपंचायत समोर स्मारक उभारण्यात आला आहे. चरी गावाला भेटी देणार्‍या माननीय व्यक्ती स्तंभाला अभिवादन करीत असतात. चरी, कोपर,कोपर पाडा चरी ,ग्रामस्थ, पंचक्रोशीतील शेतकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत दरवर्षी 27 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. या वेळी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याची हॉकी संघाची कर्णधार मनस्वी नरेंद्र शेडगे हिचा भव्य सत्कार करण्यात आला.सागर थळे आणि ग्रुप यांनी शेतकर्‍यांच्या आधारावर सुमधूर गीते सादर केली.

Exit mobile version