पशुसंवर्धन विभागाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात असलेल्या आदिवासी वाडीमधील शेतकरी चिंतेत पडले आहेत. त्यांच्या जनावरांना आणि पशूंना लंपी आजाराने ग्रासले असून त्याकडे पशुसंवर्धन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. याबाबत आदिवासी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांकडून पशुसंवर्धन विभागाला अल्टिमेटम देण्यात आला आहे. जर एखादे जनावर दगावले, तर शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आदिवासी संघटना आंदोलन करेल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिवासी वाड्या या माथेरानच्या डोंगर रांगेत वसल्या आहेत. त्या ठिकाणी सागाची वाडी, चिंचवाडी, मना धनगर वाडा, आसल वाडी, नाण्याचा माळ इत्यादी वस्ती असून या भागात राहणारे आदिवासी लोकांचा दुग्ध व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे प्रत्येक घरात पशू आणि जनावरे असून त्यांची देखभाल हे आदिवासी लोक करीत असतात. परंतु, त्या भागातील काही शेतकऱ्यांच्या पशूंना लंपी आजाराने ग्रासले असून पशुसंवर्धन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक लहान पशू देखील या आजाराने त्रस्त असून आदिवासी शेतकरी चिंतेत सापडले आहेत. आदिवासी लोकांचे पशुधन हे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असून आदिवासी समाजातील शेतकरी जगला पाहिजे यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची तयारी दाखवायला हवी, अशी मागणी आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मालू निरगुडे यांनी केली आहे. तसेच, सागाची वाडी आणि अन्य वाड्यांमध्ये जनावरांना लंपीने ग्रासले असताना त्या जनावरांची या आजारापासून सुटका करावी, यासाठी कोणत्याही उपाययोजना पशुसंवर्धन विभागाकडून केल्या जात नाहीत. त्याचवेळी या आदिवासी वाड्यापासून 2 किलोमीटर अंतरावर चिंचवली येथे पशुवैदयकीय दवाखाना आहे. तरीदेखील पशुवैद्यकीय अधिकारी जनावरांच्या तपासणीच्या कामी पोहचत नाहीत, ही खेदाची बाब असल्याचे आदिवासी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. लंपी आजाराने त्रस्त असलेल्या जनावरांचे मालक असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी आपली व्यथा शासन दरबारी सांगितली आहे; तरीदेखील पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहचत नाहीत. ही खेदाची गोष्ट असून शासनाने अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडे यांनी केली आहे.






