आदिवासींचा पाणीप्रश्‍न कायमचा मिटला

सोलर नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन
महिलांच्या चेहर्‍यावर उमटले हसू

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड हा आदिवासीबहुल तालुका असून, येथील दुर्गम दुर्लक्षित व डोंगर कड्या कपारीत वसलेल्या शेकडो आदिवासी वाड्या पाड्या गावांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रशासनाला याकामी स्वदेश फाऊंडेशनची मोलाची साथ लाभली आहे. बौद्ध विकास मंडळ पाछापूर पंचशीलनगरात सोलर नळपाणी पुरवठा योजनेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यामुळे येथील आदिवासींचा पाणीप्रश्‍न कायमचा मिटला आहे.
यावेळी शेकाप नेते तथा जि.प.चे माजी सदस्य सुरेश खैरे यांनी, पाणी हे जीवन आहे, मानवी वस्तीत मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. विकासकामांमध्ये नळपाणी पुरवठा योजना राबविण्यावर विशेष भर दिला जातोय. पंचशीलनगरमधील या योजनेला लवकरच आरसीसीमध्ये पाण्याची टँक बनवून देऊ, असे आश्‍वासन दिले.
यावेळी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी पंचशीलनगराचा सर्वांगीण व शाश्‍वत विकास होत असल्याचे समाधान व्यक्त केले. तसेच स्वदेश फाऊंडेशनचे शिवदास पायल यांनी सदर योजनेची माहिती दिली. यावेळी शेकाप नेते सुरेश खैरे, तहसीलदार दिलीप रायन्नावार, सुधागड तालुका बौद्धजन पंच कमिटी अध्यक्ष भगवान शिंदे, प्रभाकर गायकवाड, स्वदेश फाऊंडेशन व्यवस्थापक शिवदास पायल, अमूल त्रिभुवन, सिद्धांत गायकवाड, राहुल महाडिक, मधुकर महाडिक, विजय महाडिक, ग्रामविकास समिती पंचशीलनगर, बौद्ध विकास मंडळ पंचशीलनगर ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version