सर्पदंशाने आदिवासी महिलेचा मृत्यू

रस्ता नसल्याने वेळेवर उपचार मिळाले नाहीत

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानच्या डोंगरात असलेल्या आसलवाडीमधील विठ्ठल सांबरी यांच्या पत्नी विठाबाई शेतीची कामे उरकून घरी येत होती. दरम्यान, शेताच्या बांधावर चालताना त्यांना विषारी सापाने दंश केला. दरम्यान, सापाचा दंश झाल्याचे माहिती झाल्यावर त्यांना रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला.

विठाबाई या भाताची लावणी करण्यासाठी शेतीकडे गेल्या होत्या.15 जुलै रोजी दुपारी शेताच्या बांधावर बसून त्यांनी जेवण केले आणि त्यावेळी त्यांच्या पायाला काही टोचले असे त्यांना वाटले होते. शेतीची कामे सुरू असताना शेताच्या बांधावर असे प्रकार घडत असतात आणि त्याकडे दुर्लक्ष करून विठाबाई या तशाच शेतात काम करीत होत्या. सायंकाळी शेतातील कामे उरकून विठाबाई घरी गेल्या आणि त्यानंतर रात्रीचे जेवून करून भांडी घासण्याचे काम करीत असताना त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यावेळी शेताच्या बांधावर ज्या ठिकाणी पायाला सापाने दंश केला होता, तेथे सूजदेखील आली होती.

रक्ताची उलटी आणि पायाला आलेली सूज पाहून गावकर्‍यांनी विठाबाई यांना सापाने दंश केला असल्याचे ध्यानात घेतले. त्यानंतर तात्काळ विठाबाई यांना नेरळ येथे रुग्णालयात आणण्याची हालचाल सुरू केली. मात्र, माथेरानचे डोंगरात पक्का रस्ता वनविभाग करू देत नाही. त्यामुळे रस्ता नसल्याने आसलवाडी ते बेकरेवाडी यादरम्यान ग्रामस्थांनी विठाबाई यांना चादरीची झोळी करून आणले. त्यानंतर बेकरे वाडी येथून वाहनात बसवून नेरळ येथे साई हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्याआधी विठाबाई विठ्ठल सांबरी यांचा मृत्यू झाला होता.

आमच्या वाड्यांमध्ये यायला पक्का रस्ता देश स्वतंत्र होऊन 78 वर्षे झाली तर तयार झालेला नाही. आसलवाडी आणि माथेरानचे डोंगरातील वाडीपर्यंत पोहोचणारा रस्ता असता तर कदाचित विठाबाई यांना योग्य वेळेत रुग्णालयात नेता आले असते. त्यांच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत याला प्रामुख्याने शासनाची भूमिका जबाबदार असून, आम्ही त्या भागातील रस्त्यासाठी अनेकवेळा रास्ता रोको आणि उपोषणे केली आहेत. सरकार आमच्या लोकांसाठी रस्ता करणार आहे काय?

जैतू पारधी,
स्थानिक कार्यकर्ते
Exit mobile version