ओल्या काजूमुळे आदिवासी महिलांना रोजगार

| पनवेल | वार्ताहर |

उन्हाळा सुरु होताच पेणमधील ओला काजू पनवेलच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. पेणमधील आदिवासी महिला ओल्या काजूच्या बिया विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणत आहेत. सुक्या काजू बियांपेक्षा ओल्या काजूगरांना काहीसा जादा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी व बागायतदारांकडून सुक्या काजू बियांपेक्षा ओले काजूगर विक्री करण्याकडे कल वाढला आहे.

चविष्ट आणि पौष्टिक असलेल्या ओल्या काजूगरांचा दर चांगलाच वधारला आहे. गेल्या काही वर्षामध्ये ओसाड असलेले माळरान रोजगार हमी योजना आणि फळबाग लागवडीच्या माध्यमातून ओलिताखाली आले आहे. त्यामुळे काजूच्या बागा विकसित झाल्या आहेत. मात्र, प्रतिकूल हवामानासह विविध कारणांमुळे उत्पन्नासह काजू बियांच्या विक्रीदरामध्ये कमालीचा चढ-उतार दिसत आहे. त्यातून, जमाखर्चाचा मेळ बिघडत चालला आहे. सुक्या काजूबियांपेक्षा ओल्या काजूगरांना मागणी आणि जादा दर मिळत आहे. शेतकरी आणि बागायतदारांकडून ओले काजूगर विक्री करण्याला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.

चविष्ट, रूचकर असलेल्या ओल्या काजूगरांना पनवेल, मुंबई, पुणे आदी ठिकाणी मोठी मागणी असल्याची माहिती आदिवासी महिलेने दिली. ओल्या काजूगरांना मिळणारा जादा भाव आणि वाढत्या मागणीमुळे आदिवासी शेतकर्‍यांचा ओले काजूगर विक्रीकडे अधिक कल आहे.

Exit mobile version