रानभाज्या विक्रीतून आदिवासी महिलांचा उदरनिर्वाह

| तळा | प्रतिनिधी |

पावसाळ्याला सुरुवात झाल्याने पावसाळी रानभाज्या तळा बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. ज्यामध्ये कुड्याच्या शेंगा, शेवळा, भारांगी, टाकला आदी भाज्यांचा समावेश आहे. या भाज्यांचा कोणताही बियाणा नाही आणि त्यांची लागवडही केली जात नाही तर सुरुवातीच्या पावसाच्या पाण्यावर या भाज्या नैसर्गिकरित्या बहरतात.

या भाज्यांचे विविध औषधी गुणधर्म असल्याने बाजारात त्यांना मोठी मागणी असते. कुड्याच्या शेंगा व भारांगी या खायला कडवट असल्या तरी त्यांच्या औषधी गुणांमुळे शरीराला त्याचे मोठे फायदे आहेत. या भाज्यांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, अंगावर असलेले डाग, खाज, खरूज यांसारख्या अनेक व्याधींवर या भाज्या गुणकारी ठरतात. या भाज्यांना बनविण्याची देखील वेगवेगळी पद्धत आहे. कुड्याच्या शेंगा, भारांगी, टाकला या भाज्या चिरून वाफवल्या जातात व त्यानंतर त्यांतील पाणी वेळून सुगरणी या भाज्या आपापल्या पध्दतीने बनवितात.परंतु, शेवळाची भाजी विशिष्ट पद्धतीने बनविली जाते. शेवळाचा बाहेरील भाग काढून त्यातील मूळ भाग चिरून घेऊन शिजविला जातो. व शिजविताना त्यामध्ये नाण्याचा पाळा टाकतात. शेवळाची भाजी बनविताना नाण्याचा पाळा कमी पडला तर शेवळा घशाला खवखवतो त्यामुळे जाणकार सुगरणीच शेवळाची भाजी व्यवस्थितरीत्या बनवितात. तालुक्यातील आदिवासी महिला पावसाच्या सुरुवातीस जंगलात नैसर्गिकरित्या निर्माण होणाऱ्या या भाज्या विक्रीसाठी घेऊन येतात. तसेच, या भाज्यांना बाजारात मोठी मागणी असल्याने या महिलांना रोजगार उपलब्ध होतो. व या भाज्या विकून मिळणाऱ्या पैशांतून आदिवासी महिला आपला उदरनिर्वाह भागवितात.

Exit mobile version