। वेनगाव । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील वेनगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत येथील आदिवासी वाडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दारूचे धंदे व विजेच्या प्रश्नांवरून आदिवासी महिला आक्रमक झाल्या होत्या. 15 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली ग्रामसभा कोरम अभावी तहकूब करण्यात आली होती. हीच सभा बुधवारी (दि.25) घेण्यात आली.
आदिवासी वाडीत गेले काही दिवसांपासून पुरेसे पाणी मिळत नाही. यामुळे पाणी बाहेरून आणावे लागते. आदिवासी वाडी ही उंच भागावर असल्याने नळाचे पाणी सरळ खाली उतरट भागाकडे निघून जात असल्यामुळे येथील महिलांना पाणी मिळत नाही. तसेच, काही ठिकाणी पथदिव्यांवर लाईट नाही. गावात दारूचे अवैध धंदे सुरू असून ही दारू पिऊन अनेक तरुण व्यसनाहारी गेले आहेत. या दारूपायी तरुण मुले व माणसे मरण पावल्याने कित्येक महिला विधवा झाल्या आहेत. त्यामुळे गावात एकही दारूचा धंदा न ठेवता सर्व धंदे बंद करा, असा पवित्रा घेऊन उपस्थित आदिवासी महिला ग्रामसभेत आक्रमक झाल्या होत्या. यावर गावात सरसकट दारू बंदी करण्यात येईल, असे सरपंच व उपस्थित सदस्यांकडून सांगण्यात आले.
या ग्रामसभेत सरपंच अश्विनी पालकर, सदस्य अभिषेक गायकर, तंटामुक्त अध्यक्ष सचिन शेलार, शोभा दाभाडे, वसंत जाधव, अनंता गायकवाड, मंगेश पालकर, निखिल क्षिरसागर, निलेश कुडेकर, प्रसाद मिरकुटे, संगीता वाघमारे, नवशी वाघमारे, कुसुम हीलम, गुलाब पवार, शकुन वाघमारे, कुंदा वाघमारे, तारी नीलम, लक्ष्मी वाघमारे, कली वाघमारे, आदींसह महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या.