कोळे ग्रामपंचयतीचा दुजाभाव
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मोर्चाचा इशारा
| म्हसळा | वार्ताहर |
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना आजही गोरगरीब, कष्टकरी आदिवासी समाजातील घटकाला जीवनावश्यक मूलभूत सुविधा व हक्क प्राप्त करण्यासाठी शासन दरबारी झगडावे लागत आहे. या सेवा सुविधांअभावी आजही आदिवासी समाज वंचित आहे. याचे विदारक वास्तव म्हसळा तालुक्यातील कोळे आदिवासीवाडीत पहायला मिळत आहे. याबाबत गटविकास अधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.
कोळे आदिवासी वाडीत वीज, पाणी आणि रस्ता नसल्याने येथील आदिवासींना डबक्यातले गढूळ पाणी प्यावे लागत असल्याचे शांतीदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्षा तृषाली जाधव, आदिवासी समाज तालुका अध्यक्ष यशवंत पवार यांनी शासनाचे निदर्शनास आणून दिले आहे. कोळे आदिवासी वाडीत लोकांना मूलभूत सुविधा देण्यास ग्रामपंचायत दुजाभाव करीत असल्याने अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि शासनाकडून न्याय मिळविण्यासाठी येत्या 15 दिवसांत आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा काढणार असल्याचे तृषाली जाधव, यशवंत पवार तसेच कोळे आदिवासी ग्रामस्थांनी म्हसळा गटविकास अधिकारी यांना निवेदाद्वारे कळविले आहे.
येथील आदिवासी ग्रामस्थ अशुद्ध पाणी पीत असल्याने त्यांना झालेला गंभीर आजार बरा होत नसल्याने शासनाने लागलीच कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनात नमूद केली आहे.गंभीर आजार असलेल्या रुग्णांना दवाखण्यात न्यायचे झाल्यास वाडीत रुग्णवाहिका यायला रस्ता नाही, अशी अवस्था आहे. कच्च्या रस्त्यावरून रात्री-अपरात्री येण्या-जाण्यास विजेची सुविधा नसल्याने साप चावण्याची किंवा जंगली स्वापद हल्ला करून कोळे आदिवासी गावातील लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने कोळे आदिवासीवाडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्यामुळे लोकांना पिण्यास शुध्द पाणी, पक्का रस्ता आणि स्ट्रीट लाईट अशा मूलभूत हक्कापासून अनेक वर्षांपासून वंचित ठेवले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोळे आदिवासी वाडीत मूलभूत सुविधांसाठी संबंधित प्रशासकीय अधिकार्यांनी त्वरित दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा 15 दिवसांनी सर्व आदिवासी समाज त्यांच्या मानवी हक्कासाठी जाहीर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे.