खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी; लागवडीसाठी सेंद्रिय खतांचा वापर
| सुकेळी | विशेष प्रतिनिधी |
सुकेळी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकांची वस्ती आहे. दररोज अतिशय मेहनत करुन व प्रामाणिकपणे आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत. सद्यस्थितीत गावठी भाज्यांमुळे येथील आदिवासी बांधवांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळत असल्याने या भागातील आदिवासी बांधवांच्या विशेषतः महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसुन येत आहे.
पावसाला सुरू झाल्यापासून जंगली भागात मिळणाऱ्या रानटी भाज्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत होत्या. सद्यस्थितीत देखील सुकेळी परिसरामध्ये गावठी भाज्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. सुकेळी परिसरातील आदिवासी बांधवांनी देखील दोन ते तीन महिन्यांपासून मेहनत करुन गावठी भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत त्या भाज्या विक्रीसाठी नागोठणे, कोलाड, खांब तसेच गावोगावी घेऊन जात आहेत. तर काही महिला या मुंबई-गोवा महामार्गालगत सुकेळी या ठिकाणी भाजी विक्रीसाठी बसत आहेत.
बहुतांश ग्रामीण भागात पावसाळ्यात रानावनात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवतात, तर याच हंगामात लागवड केलेल्या गावठी भाज्याही मिळू लागतात. या भाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या गावठी भाज्यांमध्ये वांगी, मिरची, काकडी, भेंडी, शिराळी, घोसाळे, कारले, दुधी, भोपळा, माट, अळुची पाने, आदि भाज्यांचा समावेश आहे. या भाज्यांना चांगली मागणी आहे. अळूची पाने, दुधी, काकडी, भेंडी, टरबूज, कोवाली, रानटी फळे ही मिळतात.
लागवडीच्या भाज्यांचे पीक घेण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो, तर रानभाज्या या प्राकृतिक उगवत असल्यामुळे आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. फक्त दोन ते अडीच महिन्यांपर्यंतच याची आवक बाजारात असते. या काळात रानभाज्यांना खवय्यांची मागणी असते. त्यामुळे या भाज्यांना मागणीही चांगली असते. यातून विक्रेत्या महिला चांगला रोजगार मिळवतात.
