आदिवासींची उपेक्षा अजूनही सुरूच

गरोदर मातेला रुग्णालयात नेण्यासाठी झोळीचा आधार

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत माथेरानच्या कुशीत वसलेल्या 12 वाड्यांमधील नागरिकांची आजही उपेक्षा सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी उपचाराला विलंब झाल्याने साप चावलेल्या महिलेचा मृत्यू झाला असताना आता गरोदर मातेला रुग्णालयात नेण्यासाठी आसलवाडी ग्रामस्थांना झोळीचा आधार घ्यावा लागला आहे. तर बाळासोबत परत येतानादेखील झोळीतूनच न्यावे लागले आहे. रस्त्याच्या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या 12 वाड्यांमधील बहिणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नाहीत का, असा जळजळीत सवाल येथील आदिवासी बांधवानी उपस्थित केला आहे. दरम्यान, ग्रामीण विकास यंत्रणेकडून मंजूर रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात नसल्याने याबाबत येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जत तालुक्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान डोंगराच्या कुशीत अनेक आदिवासी वाड्या वस्त्या आहेत. मात्र एका बाजूला देशाचा अमृतमहोत्सव साजरा होऊन देखील दुसरीकडे या वाडयांना साधा रस्ता उपलब्ध होऊ शकला नाही. तेव्हा या वाडयांना रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी अनेकदा आदिवासी समाजाने आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको केले. बेकरेवाडी, किरवलीवाडी, असालवाडी, नाण्याचा माळ, मण्याचा माळ, यासह 12 वाड्या रस्त्याविना संघर्षमयी जीवन जगत आहेत. तर एखाद्या रुग्णाला रुग्णालयात नेताना झोळी करून न्यावी लागत असल्याने त्यात वेळ जाऊन रुग्ण दगावण्याचा घटना घडत असल्याने आदिवासी समाज संतप्त झाला आहे.

दि. 15 जुलै रोजी आसलवाडी येथे राहणारे सांबरी कुटुंबातील विठाबाई यांना साप चावला होता. मात्र, रुग्णालयात नेण्यासाठी त्यांना वाडीतून झोळीतून न्यावे लागले आणि उपचाराला विलंब होऊन त्यात त्यांचा जीव गेला. तर, दि. 27 ऑगस्ट रोजी आसलवाडी काशी सचिन पिरकड या गरोदर मातेला त्रास होऊ लागल्याने तिला नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यावे लागले. मात्र, रस्त्याअभावी तिला झोळी करून न्यावे लागले. सुदैवाने ती वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचून तिला उपचार मिळाले. तर तिची प्रसूती होऊन तिला मुलगी झाली. बाळासह परत या मातेला घरी आणण्यासाठी झोळीतून आणावे लागले आहे. येथील 14 कोटी रुपये मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात नाही. कधी ग्रामीण विकास यंत्रणा तर कधी वनविभाग यांची अडचण सांगून वेळ मारली जात आहे. पण रस्ता होणार केव्हा? जर रस्ता होणार नव्हता, तर राज्याचे मुख्यमंत्री यांनी ऑनलाईन भूमीपूजनाचा घाट एवढ्या लवकर का घातला, असा प्रश्न आदिवासी संघटनेचे अध्यक्ष जैतू पारधी व गणेश पारधी उपस्थित केला आहे. तर, याबाबत ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

बारा वाड्या रस्त्याविना
आजच्या प्रगत भारत देशात तब्बल 12 वाडयांना रस्ता नाही ही मोठी शोकांतिका आहे. रस्त्याला निधी मंजूर असून, अजून कामाला सुरुवात झालेली नाही, त्यामुळे आदिवासी बांधवांच्या पदरी निराशा पडते की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. तर दुसरीकडे रस्त्याअभावी येथील नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे भयानाक वास्तव आहे. अशात प्रशासन उघड्या डोळ्यांनी हे मृत्यू कुठवर पाहत राहणार, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

राज्य शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यात लागू केली. ही योजना घोषित केली आणि महिलांना पैसेदेखील आले. मात्र आम्हाला पैसे नको तर रस्ता हवा आहे. आमच्या येथील माथेरानच्या कुशीत वसलेल्या 12 वाड्यांच्या रस्त्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी ऑनलाईन भूमिपूजन केले, मात्र त्याला आठ महिने लोटूनदेखील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. दिवसागणिक रस्ता नसल्याने येथील नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. तेव्हा शासनाने आमची विनंती स्वीकारावी आणि आम्हाला लवकर रस्ता करून द्यावा.

जैतू पारधी, ग्रामस्थ,
Exit mobile version