फणसवाडीतील आदिवासी 6 महिन्यांपासून अंधारात; मूलभूत सोयी सुविधांपासून आदिवासी बांधव वंचित

। वावोशी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील वावोशी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधव राहत असलेल्या फणसवाडीमध्ये गेली 6 महिने वीजच गायब असल्याने या आदिवासींवर अंधारात राहण्याची वेळ आली असून याकडे वावोशी ग्रामपंचायत प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे.
आपला भारत देश अमृतमहोत्सव साजरा करीत असून आजही आपल्या भारतातील ग्रामीण भागातील आदिवासींना वीज, पाणी, रस्ता या मूलभूत सोयीसुविधांसाठी झगडावे लागत आहे. खालापूर तालुक्यातील वावोशी ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम आणि डोंगराळ भागातील फणसवाडी या आदिवासी वाडीत गेल्या 6 महिन्यांपासून लाईटच गायब आहे. त्यामुळे येथील आदिवासींना पाणी, वीज अशा मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. या वाडीत सार्वजनिक विजेच्या दिव्यांचे पोल बसविण्यात आले आहेत ते फक्त दिखाव्या करिताच बसविण्यात आले असून या सार्वजनिक दिव्यांचा या वाडीला काहीच उपयोग नाही. कारण हे दिवे देखील नादुरुस्त असल्याने रात्री संपूर्ण गावात अंधार पसरलेला असतो. आधीच ही वाडी दुर्गम डोंगराळ भागात वसलेली असल्या कारणाने येथे रानटी हिंस्र जनावर, विषारी साप, विंचू यांचा नेहमीच वावर असतो. काही दिवसांपूर्वी एका आदिवासी च्या लहान मुलाला सर्पदंश होण्यापासून वाचविण्यात आले होते. त्याच्याकडे जर बॅटरी नसती तर त्याला त्याच्या मुलाच्या प्राणाला मुकावे लागले असते.


तसेच या आदिवासी महिलांना डोंगर चढून पाणी आणावे लागत असल्याकारणाने त्यांना मागील वर्षी नवीन पाण्याची टाकी बसविण्यात आली परंतू या आदिवासी वाडीतील वीज कनेक्शनच तोडण्यात आल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यांना पुन्हा फणसवाडीचे डोंगर चढ उतार करून सुमारे 1 किलोमिटर इतके दुर्गम भागातील अंतर चालून नदीच्या काठावरील खड्डा खोदून त्यामधील पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत असलेल्या आदिवासी वाडीत निदान पाणी आणि वीज तरी मिळावी या प्रतीक्षेत येथील आदिवासी समाज डोळे लावून बसला आहे. तरी या आदिवासी समाजाच्या संयमाची परीक्षा पाहत असलेल्या वावोशी ग्रामपंचायत प्रशासनाला जाग तरी केव्हा येणार ? असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही.

Exit mobile version