बेडीसगावच्या आदिवासी ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या बेडीसगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकीचा रस्ता ३ मार्च रोजी अज्ञात लोकांनी जेसीबी मशीनच्या साहाय्याने खोदून गायब केला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी 4 एप्रिल रोजी कर्जत तहसील कार्यालयाबाहेर जुना रस्ता पुन्हा तयार होण्यासाठी उपोषण केले होते. त्यावेळी सात दिवसात रस्ता तयार करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेने लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र शासकीय यंत्रणा कडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आदिवासी सेवा संघाचे कार्यकर्ते यांनी आज ९ मे पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरु केले आहे.

दरम्यान,या उपोषणाला कर्जत बेडीसगाव येथून २०० हुन अधिक आदिवासी ग्रामस्थ अलिबाग येथे पोहचले आहे.
कर्जत तालुक्यातील बेडीसगाव येथील नऊ आदिवासी वाड्यांकडे जाणारा रस्ता वांगणी गावातील अज्ञात व्यक्तींनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने गायब केला होता. 3 मार्च 2022 रोजी रस्ता गायब झाल्यानंतर आदिवासी ग्रामस्थांनी सर्व शासकीय कार्यालयांना विनंती अर्ज केले आहेत. मात्र आदिवासी शेतकरी यांच्या रस्त्याचा ३०० मीटर लांबीचा भाग गायब करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली नाही. तर रायगड जिल्हा परिषदेची परवानगी न घेता स्वतःच्या मर्जीने शासनाचा रस्ता उखडून टाकणाऱ्या व्यक्तींवर महिनाभर कोणतीही कारवाई झाली नाही आणि रस्ता तयार करण्याबाबत देखील शासकीय यंत्रणेकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे आदिवासी सेवा संघाचे तीन कार्यकर्ते यांनी उपोषण सुरू केले. 4 एप्रिल रोजी बेडीसगावच्या आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थांनी कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केल्यानंतर शासकीय यंत्रणा कामाला लागली आणि रात्री उशिरा सात दिवसात जुना रस्ता होता तसाच तयार करून देण्याचे लेखी पत्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र उपोषण सोडून एक महिना लोटला तरी बेडीसगाव कडे जाणाऱ्या रस्त्याचा भाग संबंधित व्यक्तींनी तयार करून दिला नाही. त्याचवेळी रस्त्याचे काम करणारी महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जुन्या रस्त्याबाबत सर्व करून देण्याचे काम करावे असे अशी कर्जत आदिवासी सेवा संघाची मागणी आहे.

आदिवासी लोकांची फसवणूक करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावातील व्यक्तींवर पोलीस गुन्हा दाखल करीत नाहीत,तर जुना रस्ता तयार करून देण्याची कार्यवाही जिल्हा परिषद बांधकाम विभाग करीत नाही. त्यामुळे नऊ आदिवासी वाड्यांचा रस्ता उखडवून गायब केल्याने बंद झाला आहे. आपला जुना रस्ता पुन्हा तयार व्हावा आणि रस्ता खोदणारे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी कर्जत आदिवासी सेवा संघाचे कार्यकर्ते जिल्हा सचिव गणेश पारधी, कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी आणि बेडीसगाव गावाचा समावेश असलेल्या शेलू ग्रामपंचायतचे सदस्य मंगळ पारधी यांनी आज ९ मे पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रायगड जिल्हाचे शेवटचे टोक असलेल्या बेडीसगाव येथून २०० हून आदिवासी लोक अलिबाग येथे पोहचले आहेत.

दरम्यान, आता रायगड जिल्हाधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य क्जर्यकारी अधिकारी बेडीसगावचा रस्ता बनवून देणार काय? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Exit mobile version