आदिवासींनी घातले रायगड जिल्हा परिषद प्रशासनाचे श्रादध

पोराबाळांसह नेला जिल्हा परीषदेवर मोर्चा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रस्त्यासारख्या मुलभूत समस्येकडे दुर्लक्ष करणार्‍या रायगड जिल्हा परिषद प्रशासनाचे आज आदिवासींनी सर्वपित्री अमावस्येला श्रादध घातले. खालापूर तालुक्यातील करंबेळी ठाकूरवाडी व खडई धनगरवाडा येथील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे रस्त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या रस्त्याला जिल्हा ग्रामीण मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. हरवलेला रस्ता शोधून द्या यामागणीसाठी आदिवासींनी थेट शिवतीर्थावर मोर्चा काढून याकडे लक्ष वेधले आहे.

प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आदिवासींनी आपल्या पोराबाळांसह जिल्हा परीषदेवर मोर्चा नेला. अलिबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून मोर्चाला सुरवात झाली. एसटी स्थानक, महावीर चौक, बालाजी नाका, मारूती नाका मार्गे हा मोर्चा पोस्ट ऑफीस जवळ दाखल झाला. तीथे तो पोलीसांनी अडविला.

संतापलेल्या मोर्चेकर्‍यांनी प्रशासनाचे श्रादध घालून आपल्या भावना व्यक्त केल्या. कामात दिरंगाई करणार्‍या अभियंत्यावर कारवाई करावी आणि रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. अखेर जिल्हा परीषदेचे कार्यकारी अभियंता बारदसकर मोर्चाला सामोरे गेले. त्यांनी या रस्त्यासंदर्भात खालापूर पंचायत समिती कार्यालयात तातडीने बैठक बोलवण्याचे मान्य केले. ग्रामीण भागातील नागरीकांना रस्ते वीज पाणी या सारख्या मुलभून प्रश्‍नांसाठी अशा पध्दतीने आंदोलने करावी लागत आहे अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

शासनदरबारी रस्ता अस्तित्वात असला तरी तो प्रत्यक्षात झालेला नाही. त्यामुळे हरवलेल्या या रस्त्याचा शोध घेण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत. जिल्हा परिषद प्रशासनाने आमचा रस्ता कुठे आहे. तो शोधून द्यावा.


संतोष ठाकूर, कार्यकर्ता ग्राम संवर्धन सामाजिक संस्था

ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वखाली काढलेल्या मोर्चात स्थानिक कार्यकर्ते उदय गावंड, संतोष घाटे, जयेश शिंदे, अंकुश माडे, रुपेश रसाळ, यशवंत माडे, सुनील घाटे, पांडू हिरवा शुभम माडे, बबलू घाटे नारायण वीर, चंद्रकांत ढेबे आदींसह मोठया संख्येने आदिवासी बांधव, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Exit mobile version