आदिवासींनी धरला तारपा नृत्यावर फेर


| ठाणे | प्रतिनिधी |

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वसुबारस साजरी करण्यात आली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील तारपाधारी अर्धपुतळ्याचे आदिवासी बांधवाच्यावतीने पूजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकातील आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या नामफलकाचेही पूजन यावेळी करण्यात आले. आदिवासी समाजात दिवाळीच्या वसुबारस या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ठाणे जिल्हा एकेकाळी आदिवासीबहुल होता. मात्र, जिल्ह्याचे विभाजन तसेच शहापूर, मुरबाड तालुकेही आता नागरीकरणाच्या वाटेवर असल्याने आदिवासी बांधवांनाही आपल्या प्रथा-परंपरांची आठवण राहावी, रोजी-रोटीसाठी शहराकडे येत असल्याने शहरी भागातील बांधवांना वसुबारस सणाचे महत्व कळावे, तसेच ही परंपरा कायम राहावी यासाठी गेल्या 20 -22 वर्षांपासून आदिवासी संघटना व कार्यकर्ते एकत्र येऊ न वसुबारस जिल्ह्याच्या ठिकाणी साजरी करत आहेत. यावेळी आदिवासी बांधवांनी तारपा नृत्य सादर करत फेर धरला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तारपा धारी पुतळ्याचे पूजन केले.

Exit mobile version