। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतीय सैन्य दलातील शहिद सुयोग अशोक कांबळे यांना रविवारी (दि.12) शासकीय इतमामात नारंगीमध्ये मानवंदना दिली जाणार आहे.
अलिबाग तालुक्यातील नारंगी बौध्दवाडी येथील रहिवासी असणारे सुयोग कांबळे गेल्या अनेक वर्षापासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. त्यांनी सैन्यदलात 18 वर्षे सेवा केली होती. 4 ऑक्टोबर 2023 मध्ये सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना अचानक धरणातील बंधारा फुटला. त्या पाण्यामध्ये त्याची संपूर्ण तुकडी वाहून गेली. अनेकजण गाढले गेले. या घटनेनंतर सिक्कीममधील सरकारमार्फत त्यांचा शोध घेण्यात आला. परंतु ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांना सैन्य दलाकडून शहिद घोषित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नारंगीपर्यंत अंत्ययात्रा पायी काढण्यात येणार आहे. रविवारी (दि.12) जानेवारीला सकाळी 10 ते 11 या वेळेत रॅली निघणार आहे. भारतीय सैन्य दलाकडून त्यांना शासकीय इतमामात मानवंदना दिली जाणार आहे.