कोतवाल वाडीमध्ये हुतात्म्यांना अभिवादन

तिथीप्रमाणे सिद्धगड बलिदान दिन साजरा; पहाटे असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टमध्ये हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचा बलिदान दिन तिथीप्रमाणे साजरे केला जातो. आज मार्गशिष एकादशीला नेरळ येथे या दोन्ही हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या हुतात्म्यांना त्या दिवशी पहाटे सहा वाजून दहा मिनिटांनी ब्रिटिशांनी गोळ्या झाडून ठार केले होते. त्यामुळे भल्या पहाटे थंडी असूनदेखील मोठ्या संख्येने विद्यार्थी अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

ब्रिटिश सरकार विरुद्ध कर्जत तालुक्यातील तरुणांनी 1942 मध्ये आंदोलन सुरू केले होते. भाऊसाहेब राऊत, भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन सुरू केले होते. त्या लढ्यात कर्जत, मुरबाड, अंबरनाथ येथील क्रांतिकारक तरुण सहभागी झाले होते. त्यावेळी कर्जत तालुक्यातील माथेरान येथील भाई कोतवाल आणि मनिवली येथील हिराजी गोमाजी पाटील यांना 2 जानेवारी 1943 रोजी वीरमरण आले होते. त्या दिवशी मार्गशीर्ष एकादशी होती आणि त्यामुळे कोतवाल वाडी ट्रस्टची स्थापना 1946 मध्ये झाल्यानंतर तेंव्हापासून या दोन्ही हुतात्म्यांना अभिवादन तिथीप्रमाणे करण्यास सुरुवात झाली होती.

स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी कोतवाल वाडी ट्रस्ट स्थापून आदिवासी समाजासाठी काम सुरू केले होते. आज हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन कोतवाल वाडी ट्रस्टकडून करण्यात आले होते. त्यावेळी पहाटे सहा वाजून दहा मिनिटांनी नेरळ विद्या मंदिर आणि नेरळ विद्या विकास या शाळांचे विद्यार्थी तसेच शिक्षक आणि देशप्रेमी लोकांच्या उपस्थितीत क्रांतिज्योत प्रज्वलित करण्यात आली. तालुक्याचे तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी क्रांती ज्योत प्रज्वलित करण्यात आल्यानंतर हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी कोतवाल वाडी ट्रस्ट अध्यक्षा अनसुया पादिर, शेतकरी नेते आणि माजी आ. पाशा पटेल, ट्रस्टच्या विश्‍वस्त संध्या देवस्थळे, सावळाराम जाधव, शेखर भडसावळे, रामचंद्र ब्रम्हांडे आणि शासकीय अधिकारी प्रज्ञा ब्रम्हांडे आदी उपस्थित होते. या वेळी शालेय विद्यार्थ्यांनी समरगीते सादर करून सकाळच्या थंडीमध्ये वातावरण प्रफुल्लित केले. यावेळी माजी आ. पाशा पटेल यांनी शेती किती महत्त्वाची आहे याची माहिती आपल्या भाषणात दिली. त्याचवेळी कर्जत तालुक्यात आजही मोठ्या प्रमाणात शेती केली जात असल्याने समाधान व्यक्त करीत हरिभाऊ भडसावळे यांनी चळवळ उभी केली ती 75 वर्षांनंतरदेखील सुरू ठेवली आहे, याबद्दल समाधान व्यक्त केले. शेतीमध्ये नवीन प्रयोग करून आपल्या कुटुंबातील तरुणांना शेतीकडे आत्कृष्ट करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Exit mobile version