रातवड विद्यालयात तिरंगा रॅली उत्साहात

। माणगाव । प्रतिनिधी ।

भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात देशभक्तीने ओतप्रोत अशा विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या सप्ताहनिमित्त विद्यालयात राष्ट्रभक्तांच्या, क्रांतिकारकांच्या चरित्र कथा, समूहगीते, तिरंगा रॅली इत्यादी कार्यक्रमांनी देशभक्तीमय वातावरण निर्माण केले आहे.

विद्यालयाच्या वतीने शनिवार, दि. 10 ऑगस्ट रोजी रातवड येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रातवड गावचे ग्रामस्थ व पालक सहभागी झाले होते. गावातील स्वामी समर्थ मठातून तिरंगा रॅलीला सुरुवात होऊन गावातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली.

गावातील महिला, पुरुष व लहानगे या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तिरंगी झेंडे, देशभक्तीपर गीते गाऊन घोषणा देत विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये देशभक्तीच्या जोशात तिरंगा रॅली संपन्न झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांचे मार्गदर्शन व ग्रुप ग्रामपंचायत रातवड ग्रामस्थ व पालकांच्या सहकार्यातून रॅली संपन्न झाली.

Exit mobile version