जाखमाता देवीचा त्रैवाषिक उत्सव

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील दिवीपारंगी गावाचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री जाखमाता देवीचा त्रैवाषिक उत्सव मंगळवारी (दि.11) दिवीपारंगी या गावात साजरा केला जाणार आहे. या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून ग्रामस्थांच्यावतीने त्याचे योग्य पध्दतीने नियोजन करण्यात आले आहे.

दोन वर्षातून एकदा हनुमान जयंतीनंतर दोन ते तीन दिवसांनी येणारा हा उत्सव ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात. पारंपारिक पध्दतीने साजरा होणार्‍या या उत्सवाचे स्वरुप दिवसेंदिवस वाढत आहे. काकड आरती, भजनांचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी देवीची पालखी काढली जाते. ही पालखी मिरवणुक काढत गावाच्या शेजारी असलेल्या समुद्राजवळ पालखीची सांगता होते. त्याठिकाणी देवीचा पाट सोडला जातो. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी तो पाट त्याच जागेवर येतो अशी ग्रामस्थांची धारणा आहे. त्यामुळे या उत्सवाला एक वेगळे स्वरुप निर्माण झाले आहे.

यंदा दि.11 रोजी हा उत्सव दिवीपारंगी गावात होणार आहे. सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास काकड आरती होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहावाजेपर्यंत संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. या उत्सवानिमित्त गावांतील ग्रामस्थांसह मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी नोकरी व्यवसायानिमित्त असणारे ग्रामस्थ देखील गावात येऊ लागले आहेत. गावात दुपारी दोन नंतर देवीच्या पालखीची मिरवणुक काढली जाणार आहे. या पालखी सोबत विविध वेशभुषा चित्ररथातील देखावे, दांडपट्टा सारखे साहसी खेळ, बहुरुपी अशा अनेक प्रकारचे सोंगणे काढला जाणार आहे. यातून पारंपारिक खेळांना व ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचा एक प्रयत्न केला जाणार आहे.

Exit mobile version