| पनवेल | वार्ताहर |
जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिघा तरुणांनी 17 वर्षीय अल्पवयीन तरुणावर धारधार शस्त्राने वार करून पलायन केल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात अल्पवयीन तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खारघर पोलिसांनी या घटनेतील तिघा हल्लेखोर तरुणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील 17 वर्षीय जखमी तरुण खारघर सेक्टर-33 मध्ये राहतो, तर त्याच्यावर वार करणारे रुद्र बारवकर, पक्या व त्यांचा तिसरा साथीदार हे सारे खारघरमध्येच राहणारे आहेत. काही दिवसांपूर्वी हल्ला करणारे तरुण खारघरमधील एका पानटपरीवर उभे असताना या अल्पवयीन तरुणाने त्यांना हटकले होते, यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता. त्या वेळी त्यांच्यातील वाद मिटवण्यात आला होता. मात्र, या घटनेचा राग मनात धरून हा अल्पवयीन तरुण खारघर सेक्टर-35 मधून दुचाकीने जात असताना या तिघांनी त्याचा पाठलाग करून त्याला आयसीआयसीआय बँकेसमोर अडवले. त्यानंतर या तरुणांनी त्यांच्याजवळ असलेल्या धारधार शस्त्राने अल्पवयीन तरुणाच्या हातावर, पाठीवर, मानेवर तसेच डोक्यावर वार करून तेथून पलायन केले. या हल्ल्यात अल्पवयीन तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खारघर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी तरुणाचा जबाब नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी मारेकरी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.