| अकोला | वृत्तसंस्था |
अकोला लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत बघायला मिळणार आहे. भाजपा, मविआ आणि वंचितनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, मविआ आणि भाजपानं यंदा मराठा कार्डचा पत्ता टाकल्यानं वंचितची चांगलीच गोची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं या तिहेरी लढतीत कोण विजयाचा एक्का ठरेल याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.
अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपानं माजी खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ऐनवेळी मविआशी काडीमोड करत स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. तसंच मविआनं डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या तिन्ही उमेदवारांपैकी प्रकाश आंबेडकर हे जवळपास 12 व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर भाजपाचे अनुप धोत्रे आणि मविआचे डॉ. अभय पाटील हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहे.
दुसरीकडं प्रकाश आंबेडकर यांनीही यावेळी या दोन्ही नवख्या उमेदवारांसमोर आपले दंड थोपटले. ते जर यावेळी मविआसोबत असते तर त्यांच्या विजयाची शक्यता सर्वात जास्त असती, अशी चर्चा सध्या अकोला लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. त्यांच्या विजयासंदर्भात पोषक वातावरण असल्याचंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं होते. परंतु, त्यांनी मविआची साथ न घेतल्यानं आता त्यांच्या विजयाचा मार्ग पुन्हा खडतर झाल्याचं चित्र आहे. त्यामुळं आता भाजपा आणि मविआच्या मराठा कार्डमधून कोणत्या मराठा उमेदवाराला विजयाचा पेढा खायला मिळतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अकोल्यात तिहेरी लढत
