श्री रामेश्वर मंदिर रोषणाईत न्हाऊन निघाला
| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचे केंद्र असलेल्या चौल गावात गुरुवारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त त्रिपुरी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. श्री रामेश्वर मंदिर परिसर दिव्यांच्या तेजाने आणि भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला.
भगवान शंकर यांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून देवतांना दिलेल्या मुक्तीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. याच कारणामुळे ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. दर्शन, पूजन, अभिषेक आणि दीपदानासाठी भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्वत्र हर हर महादेवच्या घोषांमध्ये भक्तीभाव ओसंडत होता. संध्याकाळी मंदिर परिसर मनमोहक विद्युत रोषणाईने उजळला. श्री रामेश्वर मंदिराच्या शिखरावर पारंपरिक त्रिपुरी दिवा प्रज्वलित करण्यात आला. खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील पवित्र पाण्याच्या कुंडाभोवती आकर्षक रंगीबेरंगी दिव्यांची लायटिंग करण्यात आली होती. या प्रकाशात संपूर्ण कुंड आणि मंदिर असे न्हाऊन निघाले की, दृष्य पाहताना स्वर्गीय सौंदर्य अनुभवत असल्याचा भास होत होता. प्रसन्न, निसर्गरम्य आणि आनंददायी वातावरणाने भाविकांना अविस्मरणीय अनुभव मिळाला. आरत्या, भजन, कीर्तन आणि जयघोषांनी वातावरण दुमदुमले. दीपोत्सवाचे सौंदर्य पाहण्यासाठी चौलसह परिसरातील विविध गावांमधील नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थ, मंदिर समिती आणि स्थानिक युवक मंडळांच्या एकत्रित प्रयत्नांतून या उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने चौलमधील श्री रामेश्वर मंदिर पुन्हा एकदा श्रद्धा, परंपरा आणि प्रकाशोत्सवाच्या उजेडात चमकले. या दिव्य सोहळ्याने चौलच्या धार्मिक वारशाला नवचैतन्य मिळाले आणि देवभक्तांच्या मनात शांतता, आनंद व भक्तिभावाची अनुभूती रूजवली.
