| सिंगापूर | वृत्तसंस्था |
ट्रीसा जॉली- गायत्री गोपीचंद या भारताच्या महिला जोडीने गुरुवारी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद केली. ट्रीसा-गायत्री जोडीने महिला दुहेरी विभागातील लढतीत बेक हा ना- ली सो ही या जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियन जोडीला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत भारताला यश मिळाले असले, तरी एकेरीत निराशेला सामोरे जावे लागले आहे. पी. व्ही. सिंधू हिचे महिला एकेरीतील, तर एच. एस. प्रणोय याचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. ट्रीसा जॉली – गायत्री गोपीचंद ही भारतीय जोडी जागतिक क्रमवारीत 30व्या स्थानावर आहे. याआधी दक्षिण कोरियन जोडीकडून दोन वेळा भारतीय जोडीला पराभवाचा सामना करावा लागला होता. ट्रीसा – गायत्री जोडीला त्यांच्याविरुद्ध हा पहिलाच विजय ठरला. बेक हा ना – ली सो ही या जोडीकडून पहिल्या गेममध्ये चुका झाल्या. याचा फायदा भारतीय जोडीने घेतला. 18-9 अशी आघाडी घेत पहिला गेम 21-9 असे जिंकण्यात त्यांना यश मिळाले. दुसर्या गेममध्ये ट्रीसा जॉली – गायत्री गोपीचंद जोडीकडून चूक घडली. त्यामुळे दक्षिण कोरियन जोडीला या लढतीत पुनरागमन करता आले. बेक हा ना – ली सो ही या जोडीने हा गेम 21-14 असा जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. तिसर्या गेममध्ये दोन्ही जोड्यांमध्ये 8-8 अशी बरोबरी झाली. ही लढत अटीतटीची होणार, असे वाटू लागले; पण ब्रेकआधी भारतीय जोडीने दोन महत्त्वाचे गुण मिळवले आणि सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. भारतीय जोडीने आक्रमक खेळ करताना 16-9 अशी आघाडी मिळवली. अखेर तिसरा गेम 21-15 असा जिंकण्यात त्यांनी बाजी मारली.