मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकचा अपघात; चालकाचा मृत्यू

। खोपोली । प्रतिनिधी ।

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका थांबता थांबेना अशीच परिस्थिती झाली आहे. दिवसागणिक अपघाताची मालिका सुरू असल्याने या मार्गावरील प्रवास जीवावर बेतणार बनला असल्याचे चित्र असून, याला वाहन चालक ही काही प्रमाणात जबाबदार असल्याचे समोर येत आहे. बुधवारी (दि.17) सायंकाळी सिमेंटचे ब्लॉक वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक वरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी किलोमिटर 45/500 ला साडे चार वाजण्याच्या सुमारास पुणे बाजू कडून मुंबईकडे सिमेंट ब्लॉक घेऊन निघालेला ट्रक मुंबई दिशेने जात असताना अमृतांजन ब्रिजच्या जवळ आल्यावेळी ट्रकचे ब्रेक निकामे झाल्याने ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला आणि या ठिकाणी असणाऱ्या कॉलमला जोरदार धडकल्याने अपघात घडला. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचे नाव समजू शकले नाही. या अपघातामुळे काही वेळेसाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यांनतर तात्काळ आय आर बी टीम वाहतूक पोलीस व अपघातग्रस्त टीमसह सामाजिक कार्यकर्त्यानी अपघातग्रस्त ट्रक बाजूला केल्याने पुन्हा वाहतूक सुरळीत झाली आहे.

Exit mobile version