ट्रकची मोटरसायकलला धडक; एकाचा मृत्यू, एक जण जखमी 

अपघातानंतर ट्रक चालक मोकाटच; नागोठणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह 

| नागोठणे | प्रतिनिधी |

गुरुवारी (दि.6) किल्ले रायगडावरील शिवराज्यभिषेक दिनाच्या पहाटेला ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे चिकणी गावा समोरील मुंबई गोवा महामार्गावर हॉटेल मयूर व हॉटेल गुलमोहर यांच्यासमोर वडखळ कडून कोलाड बाजूकडे जाणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली त्‍यामध्ये मोटार सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून मोटरसायकलवर पाठी बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

पारस अशोक सांडे (19) रा. पेढांबे, अलिबाग हा आपला मित्र प्रथम गणेश पाटील (19) रा. हाशीवरे, अलिबाग याच्यासह मुंबई गोवा महामार्गावरुन बजाज कंपनीच्या पल्सर मोटारसायलवर वडखळ बाजूकडून कोलाड बाजूकडे जात असताना ते नागोठणे नजीक मौजे चिकणी गावच्या हद्दीतील हॉटेल गुलमोहर व हॉटेल मयूर याठिकाणी पाठी मागून येणाऱ्या एस के ब्रदर्स या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालवाहू ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पारस व प्रथम हे दोघेही मोटारसायकलवरून खाली पडत ट्रकच्या मागच्या टायर खाली सापडले. या रक्तरंजित अपघातात पारस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तर, त्याचा मित्र प्रथम याच्या डाव्या मांडीवरुन टायर गेल्याने त्याला देखील गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून त्याला अधिक उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, या अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. ट्रक चालकावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नागोठणे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे या अपघातातील ट्रक चालक दोन दिवसानंतरही मोकाट आहे. अशावेळी नागोठणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर, या अपघाता संदर्भात अधिक तपास सुरु असून यामध्ये कुणाच्या चुकीमुळे सदरचा अपघात घडला यासंदर्भात सखोल माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version