ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण

पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी केला हल्ला

| नवी मुंबई | वार्ताहर |

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी नवी मुंबईत केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी रस्त्यावरील वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. लाठ्या-काठ्यांनी पोलिसांना मारहाण करण्यात आली. तसेच, दगडफेक झाल्याने काही पोलिस जखमी झाले. पोलिसांनी अधिक कुमक मागवली आणि लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्यात आले. 50 हून अधिक ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती एनआरआय पोलिसांनी दिली.

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार रस्ते अपघातात मदत केली नाही तर 10 लाखांचा दंड आणि 7 वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे. या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी आज सकाळपासून जेएनपीटी मार्गावर बेलापूर नजीक कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर चक्काजाम आंदोलन सुरु केले. सकाळी आंदोलन शांततेत सुरु झाले. पोलिसांनी रस्त्यावरील ट्रक बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. मात्र, दुपारी साडेबारानंतर काही उत्साही ट्रक चालकांनी पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी अटकाव केला. आंदोलकांची समजूत काढत असताना काही ट्रक चालकांनी सामान्य गाड्यांना लक्ष करीत काठ्यांनी हल्ला केला. यात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर रस्त्यावर दगड टाकण्यात आले. पोलिसांवर दगडफेक केली गेली आणि काठ्यांनी काही पोलिसांना मारहाण करण्यात आली.

Exit mobile version