। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
जाकादेवी परचुरी मुख्य मार्गावर उक्षी रेल्वेस्टेशनकडे जाणार्या उतारावर चिरा भरून जाणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी दुपारच्या सुमारास घडला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील सावंत यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये चिरे भरून चालक आनंद धरसिंग राठोड हा चवे येथून परचुरी बौद्धवाडी येथे जात होता. परचुरी येथे उक्षी रेल्वेस्टेशनकडे जाणार्या वळण असलेल्या उतारावर येताच ट्रकचा ब्रेक निकामी झाला आणि ट्रक रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाला. यावेळी त्याच्याबरोबर चिरे उतरवण्यासाठी अन्य सहा कामगार देखील ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकले होते. त्यावेळी तेथून येणार्या-जाणार्या वाहनांमधील लोकांनी ट्रक कॅबिनमध्ये अडकलेल्या चालक तसेच अन्य कामगारांना बाहेर काढले. या अपघातात सिद्धू मोतीराम चव्हाण (32) याच्या डोक्याला मार लागला होता. तर, अन्य सहाजणांना किरकोळ दुखापत झाली होती. या सर्वांना जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सिद्धू चव्हाण याचा मृत्यू झाला आहे.





