मोहिते पाटलांच्या हातात तुतारी

| माढा | प्रतिनिधी |

धैर्यशील मोहिते पाटील यांनी हातात तुतारी घेऊन शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुतण्याने पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने दोन मतदारसंघातील गणितं बदलली आहेत. धैर्यशील मोहिते पाटील मंगळवारी माढ्यातून लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे माढा आणि सोलापूर या दोन मतदारसंघातली गणितं बदलली आहे, कारण या दोन मतदारसंघावर मोहिते पाटील घराण्याचा अनेक वर्षांपासून राजकीय प्रभाव आहे.

मोहिते पाटील कुटुंबाने ताकदीने भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. मात्र भाजपने विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करून टाकली, त्यामुळे मोहिते पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली, त्याचवेळी त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं होतं.

16 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. मात्र, आपल्यासमोर कुणाचंच आव्हान नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात आता दोन तगडे उमेदवार आमने-सामने येणार आहेत, त्यामुळे निंबाळकर का मोहिते पाटील यांच्यात कुणाला दिल्लीला जाण्याची संधी मिळते? याकडे सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version