प्रयत्न करा अन् यशस्वी उद्योजक बना – डॉ. महेंद्र कल्याणकर

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोणताही व्यवसाय करताना भांडवलाबरोबरच तीव्र इच्छाशक्तीचीही गरज असते. मात्र, केवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका, छोट्या व्यवसायापासून सुरूवात करा, सातत्याने प्रयत्न करा अन् यशस्वी उद्योजक बना, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी नुकतेच येथे केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, सुप्रशासन आणि कातकरी उत्थान अभियान निमित्ताने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम तसेच शासनाच्या विविध रोजगारनिर्मिती योजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, खादी व ग्रामोद्योग मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.30 डिसेंबर 2021 रोजी जिल्हा नियोजन भवन सभागृह येथे जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नित्यानंद पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरूण पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक वर्षा पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्यामकांत चकोर, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) चे संचालक आनंद राठोड, समन्वयक मीना श्रीमाळी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रदीप सावंत, स्व.शामराव पेजे कोकण महामंडळाचे श्री.रविंद्र दरेकर, कातकरी समाजातील रायगड जिल्ह्यातील पहिले अ‍ॅडव्होकेट रविंद्र पवार, विविध बँकांचे प्रतिनिधी, बचत गटाच्या महिला, आयटीआयचे विद्यार्थी, आरसेटीचे प्रशिक्षणार्थी, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी, तर आभार प्रदर्शन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी केले.


महत्त्वाकांक्षी योजना
राज्यातील युवक-युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळून राज्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे, त्याद्वारे ग्रामीण व शहरी भागात सूक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे रोजगाराच्या व्यापक संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे, या उद्देशाने शासनाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित आहे. शासनाच्या भरपूर योजना आहेत मात्र त्यांचा सूक्ष्म अभ्यास करून छोट्या उद्योगापासून सुरूवात करावी. उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या व प्रामाणिक प्रयत्न करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण व त्या प्रशिक्षणाचे शुल्क जिल्हा प्रशासन देईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

Exit mobile version