मुंबईचा हिमाचल प्रदेशवर विजय; महाराष्ट्र, विदर्भ संघाकडून निराशा
| जयपूर | वृत्तसंस्था |
विजय हजारे चषक स्पर्धेतील मंगळवारचा दिवस महाराष्ट्रातील तिन्ही संघांसाठी रोमांचक ठरला. मुंबईने शेवटच्या क्षणी विजय मिळवला, तर महाराष्ट्राला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. विदर्भ संघही फार काही कमाल दाखवू शकला नाही, त्यांनाही पराभूत व्हावे लागले. यादरम्यान, मंगळवारी विविध स्टार खेळाडू मैदानात होते. त्यातील काही खेळाडू चमकले, तर काहींसाठी हा दिवस फारसा खास ठरला नाही.
यावेळी मुंबईने हिमाचल प्रदेशविरुद्ध 7 धावांनी रोमांचक विजय मिळवला. जयपूरला झालेला हा सामना पावसामुळे 33-33 षटकांचा करण्यात आला होता. या सामन्यात मुंबईने 33 षटकात 9 बाद 299 धावा करत हिमाचलसमोर 300 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मुंबईकडून कर्णधार श्रेयस अय्यरने 82 धावांची दमदार खेळी केली. तसेर्चें मुशीर खाननेही 51 चेंडूत 73 धावा केल्या. मात्र, मुंबईचे स्टार फलंदाज यशस्वी जैस्वाल (15), सूर्यकुमार यादव (24) आणि शिवम दुबे (20) स्वस्त्यात बाद झाले. हिमाचल प्रदेशकडून वैभव अरोरा आणि अभिषेक कुमार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. त्यानंतर हिमाचल प्रदेशने 32.4 षटकात सर्वाबाद 292 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, विजयपासून ते थोडक्यात दूर राहिले. हिमाचल प्रदेशकडून मुखराज मन (64), अंकुश बैन्स (53), मयंक डागर (64) यांनी अर्धशतके केली. तसेच, अमनप्रीत सिंगने 42 धावा केल्या. परंतु, शेवटच्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी घेतलेल्या बळींमुळे हिमाचल प्रदेशला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईकडून गोलंदाजी करताना शिवम दुबेने 4 बळी घेतले. तर, साईराज पाटीलने 2 आणि तुषार देशपांडे, शम्स मुलानी व मुशीर खान यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
त्यानंतर जयपूरलाच झालेल्या सामन्यात महाराष्ट्राला छत्तीसगढविरुद्ध 6 धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. पावसामुळे 31-31 षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून छत्तीसगढला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना छत्तीसगढला 29 षटकांत सर्वबाद 166 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून आयुष पांडेने 49 धावांची खेळी केली, तर, विकल्प तिवारीने 22 धावा केल्या. याशिवाय बाकी कोणाला 20 धावांचाही टप्पाही पार करता आला नाही. महाराष्ट्राकडून गोलंदाजी करताना प्रदीप धंदे आणि विकी ओत्सवाल यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. तर, राजवर्धन हंगारगेकर आणि सत्यजीत बच्छाव यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा सलामीवीर पृथ्वी शॉ 2 धावांवरच बाद झाला. तसेच, अंकित बावणे 14 धावांवर परतला. मात्र, अर्शिनने या सामन्यातही चांगली कामगिरी करताना 67 धावांची खेळी केली. तर, सिद्धेश लाड (23), ऋतुराज गायकवाड (22), रामकृष्ण घोष (7), निखिल नाईक (6) आणि विकी ओत्सवाल (0) हे देखील लवकर बाद झाले. शेवटी महाराष्ट्राला 31 षटकांत 8 बाद 160 धावाच करता आल्या. सत्यजीत बच्छाव (12) आणि राजवर्धन हंगारगेकर (1) नाबाद राहिले. छत्तीसगढकडून रवी किरणने 3 बळी घेतले. तसेच, अजय मंडलने 2, तर मोहित राऊत आणि विकल्प तिवारी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
तिसरा सामना राजकोटमध्ये विदर्भ विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात झाला. या सामन्यात उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 339 धावा ठोकल्या होत्या. उत्तर प्रदेशकडून अभिषेक गोस्वामीने 103 धावांची खेळी केली. तसेच, ध्रुव जुरेलने 56 धावांची, तर प्रियम गर्गनेही 67 धावांची खेळी केली. कर्णधार रिंकु सिंगने 57 धावा केल्या आणि तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानातून बाहेर गेला. विदर्भाकडून गोलंदाजी करताना नचिकेत भुते, यश ठाकूर, पार्थ रेखाडे आणि हर्ष दुहे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा डाव 50 षटकांत 9 बाद 285 धावांवरच संपला. त्यामुळे उत्तर प्रदेशने 54 धावांनी विजय मिळवला. विदर्भाकडून अमन मोखाडेने 147 धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय अक्षय वाडकरने नाबाद 51 धावा केल्या. परंतु, बाकी कोणीही खास काही करू शकले नाहीत. उत्तर प्रदेशकडून कुलदीप यादवने 3 बळी घेतले. कार्तिक त्यागी आणि विपराज निगम यांनी प्रत्येकी 2, तर प्रशांत वीर आणि झिशान अन्सारी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.







