| मुंबई | प्रतिनिधी |
लोकसभा प्रचारासाठी मनसेकडून (दि.17) मे रोजी जाहीर सभेचे आयोजन केले असून, या सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र, त्याच दिवशी शिवसेना ठाकरे गटानेही शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी पालिकेकडे शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे. दोन्ही पक्षांच्या सभांची तारीख एकच असून, त्यांनी एकाच दिवशी म्हणजे 18 मार्च रोजी महापालिकेकडे अर्ज केला आहे. यामुळे या मैदानासाठी संघर्ष पाहायला मिळत आहे.
दोन्ही अर्ज एकाच दिवशी प्राप्त झाल्याने तसेच एकाच तारखेला सभा असल्याने मैदान कोणाला द्यायचे याचा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याचा फैसला इनवर्ड नंबरवरून केला जाणार आहे. (दि.17) रोजी शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रथम अर्ज केला असल्याचं बीएमसीने दिलेल्या इनवर्ड नंबरवरून दिसत आहे. यामुळे नियमानुसार शिवाजी पार्क मैदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मिळणार असल्याचा विश्वास मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. शिवाजी पार्क मैदान वर्षातील 39 विशिष्ट दिवस सोडून अन्य दिवशी जाहीर सभांसाठी देण्यात येत असते.
शिवाजी पार्कसाठी दोन पक्षांमधीस संघर्ष नवा नाही. या आधी 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही अशाच प्रकार शिवसेना व मनसेमध्ये चढाओढ लागली होती. दोन्ही पक्षांनी यासाठी अर्ज केले होते. मात्र त्यावेळीही मनसेने पहिल्यांदा अर्ज केल्याने सभेसाठी त्यांना मैदान दिले होते. आता 17 मे रोजी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार की, राज ठाकरेंची तोफ धडाडणार, याची उत्सुकता आहे.
मनसेच्या भूमिकेकडे लक्ष 9 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा शिवतीर्थीवर होत आहे. राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन घेतलेली अजिम शहांची भेट व त्यांच्या महायुतीत सामील होण्याच्या होत असलेल्या चर्चा, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पाडवा मेळाव्यातून काय घोषणा करणार याची उत्सुकता आहे.







