अपघाताविना खणला बोगदा

4.16 किलोमीटर लांबीचे दोन दुहेरी बोगदे; 9.98 किलोमीटरचे बांधकाम वेगात

। पनवेल । वार्ताहर ।

वडोदरा-मुंबई या महामार्गाच्या बांधकामाचा शेवटच्या पॅकेजचे 9.98 किलोमीटर लांबीचे बांधकाम जोरदार सुरु असून या महामार्गात 4.16 किलोमीटर लांबीचे दोन दुहेरी बोगदे खणले जात आहे. यातील एक बोगदा खणण्याचे काम अवघ्या 15 महिन्यांत पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी समाजमाध्यमांवर दिली. ज्या कामाला 24 महिने लागतात तेच काम 9 महिन्यांपूर्वी झाले आहे. यासाठी 300 कामगार, 20 अभियंते दिवसरात्र एक करुन करत झटत आहेत. दुसर्‍या बोगद्याचे काम ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होईल. देशातील रस्ते बांधकामातील हा सर्वात लांबीचा बोगदा असून अपघाताविना हा बोगदा झाला याचे समाधान या कामगार व अधिकारी व्यक्त करीत आहेत.

वडोदरा मुंबई राष्ट्रीय महामार्गामुळे 15 मिनिटांत पनवेलकरांना बदलापूरला जात येईल. तसेच जेएनपीटी बंदरातील कंटेनर वाहतूक यापूढे बदलापूर मार्गे समृद्धी महामार्ग आणि दिल्ली वडोदरा महामार्गाने करता येणार असल्याने पनवेल, तळोजा, कल्याण येथील वाहतुकीचा निम्मा ताण कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वडोदरा मुंबई महामार्गाचे आरेखन केले आहे. भोज ते मोरबे या शेवटच्या पॅकेजचे 1400 कोटी रुपयांचे काम इरकॉन इंटरनॅशनल आणि जे. कुमार इन्फ्रा. प्रोजेक्ट या कंपन्या करत आहेत. शेवटच्या पॅकेजचे बोगद्यासह महामार्ग बांधण्याचे काम 45 टक्के पूर्ण झाले आहे. दुहेरी बोगद्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण खणून झाले असून उर्वरीत दुसर्‍या बोगद्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. या दोन्ही बोगद्याची मध्यभागाची उंची 13 मीटर आणि रुंदी 22 मीटर आहेत. ग्रीन फील्ड बोगद्यात वाहने मध्ये प्रवेश करु शकणार नाहीत. या पद्धतीने बोगद्यांची रचना करण्यात आली आहे. हे बोगदे खणण्यासाठी माथेरानच्या डोंगररांगामध्ये डोंगराला दिवसाला चार वेळा सुरूंग स्फोट घडवून आणले जात होते. स्फोटानंतर डोंगराला भेदून त्यातील 3 ते 4 मीटर लांबीतून निघणारा राडारोडा काढून त्यानंतर बोगद्याचे पुढील कामाची सुरुवात केली जात होती. इरकॉन कंपनीचे अभियंत्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सर्व सुरक्षेचे नियम पाळून हे काम ठरलेल्या कालावधीपेक्षा लवकर कामगार व यंत्रणा करु शकलो याचे समाधान वाटते. स्फोटापूर्वी काम करताना परिसरात वन्यजीव दिसण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र स्फोटाच्या आवाजानंतर वन्यजीव आढळले नाही. जेथे काम सुरु आहे त्यापासून काही अंतरावर मजूरांचे राहणे व जेवणाची सोय कंपनीने केल्याने मजूरांचा वाहतूक खर्च व वेळेची बचत झाली. अनेक अभियंत्यांनी याच परिसरात वास्तव्य करण्याची तयारी दर्शविल्याने बोगदा यशस्वीपणे खोदता आला.

हा बोगदा खणण्यासाठी स्वित्झर्लंड येथील बनावटीच्या यंत्रसाहित्याची जोडणी करुन बुमर ड्रील जम्बो यंत्राच्या सहाय्याने दोन्ही बोगदे खणण्याचे काम सुरु आहे. यंत्रासोबत चालक, ऑपरेटर, मजूर, मशीन सहाय्यक असे 300 मजूर याच ठिकाणी दिवसरात्र दोन पाळ्यांमध्ये काम करतात. अजूनही दुसर्‍या बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
Exit mobile version