। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये सातत्याने दररोज गढूळ पाणी पुरवठा होत आहे. यामुळे येथील नागरिक हैराण झाले असून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. माथेरान येथील नागरिकांना लवकरात लवकर पुढील आठ दिवसात शुद्ध आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा हंडा मोर्चा काढण्यात येईल.अशा आशयाचे पत्र माथेरान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माथेरान जीवन प्राधिकरणाला देण्यात आले आहे.
माथेरान या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळाला वर्षाकाठी लाखो पर्यटक भेट देत असतात. या संपूर्ण शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. येथील पाण्याचे दर देखील गगनाला भिडणारे आहेत. तरी देखील मागील काही दिवसांपासून एमजेपीकडून संपूर्ण शहराला गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. या दूषित आणि गढूळ पाण्यामुळे येथील नागरिक चांगलेच हैराण झाले असून त्यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण होत आहे. या अनुषंगाने माथेरान शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आठ दिवसांच्या आत शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करावा अन्यथा एमजेपी विरोधात हंडा मोर्चा काढण्यात येईल, असे पत्र येथील शाखा अभियंता यांना देण्यात आले. हे पत्र देते वेळी माथेरान राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष राजेश दळवी, महिला अध्यक्षा स्वाती कुमार, युवा अध्यक्ष सागर जोशी आणि जिल्हा सरचिटणीस अजय सावंत आणि येथील महिला वर्ग उपस्थित होता.





