तुर्कस्तान सोळा वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरीत

Turkey's Merih Demiral, left, scores the opening goal during a round of sixteen match between Austria and Turkey at the Euro 2024 soccer tournament in Leipzig, Germany, Tuesday, July 2, 2024. (AP Photo/Ebrahim Noroozi)

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

‘लायपझिग – बचावपटू मेरिह डेमिराल याने एकोणीस वर्षीय आर्दा ग्युलेर याच्या भन्नाट कॉर्नर किकवर नोंदविलेल्या दोन शानदार गोलच्या बळावर तुर्कस्तानने सोळा वर्षांनंतर युरो करंडक फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांनी झुंजार ऑस्ट्रियास राऊंड ऑफ 16 फेरीत 2-1 फरकाने हरविले.

डेमिराल याने पहिल्याच मिनिटास (57 सेकंद) केलेला गोल युरो करंडकातील दुसर्‍या क्रमांकाचा, तर बाद फेरीतील सर्वांत वेगवान गोल ठरला. नंतर 59व्या मिनिटास 26 वर्षीय सेंट्रल डिफेंडर डेमिराल याने हेडिंगद्वारे आणखी एक गोल नोंदविला. बदली खेळाडू मिखायल ग्रेगोरिच याने 66व्या मिनिटास ऑस्ट्रियाची पिछाडी एका गोलने कमी केली.सामन्याच्या भरपाई वेळेत (90+5 मिनिट) ऑस्ट्रियाने जबळपास बरोबरी साधली होती, मात्र तुर्कस्तानचा 35 वर्षीय गोलरक्षक मेर्त ग्युनोक याच्या अचाट गोलरक्षणामुळे ख्रिस्तोफ बाऊमगार्टनर याने अगदी जवळून साधलेले हेडिंग विफल ठरले.येथेच 2008 नंतर तुर्कस्तानची आठ संघांची फेरी निश्‍चित झाली. निलंबनामुळे तुर्कस्तानचा नियमित कर्णधार हाकान चाल्हानोग्लू या लढतीत खेळू शकला नाही. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आता तुर्कस्तानसमोर नेदरलँड्सचे आव्हान असेल.

म्युनिक येथे झालेल्या आणखी एका राऊंड ऑफ 16 लढतीत नेदरलँड्सने रुमानियाला 3-0 असे हरवून 2008 नंतर प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. सामन्याच्या विसाव्या मिनिटास कॉडी गॅक्पो याने केलेल्या गोलमुळे डच संघाला आघाडी मिळाली. गॅक्पो याचा हा यावेळच्या स्पर्धेतील तिसरा गोल ठरला. 63 व्या मिनिटास गॅक्पो याचा आणखी एक गोल व्हीएआरद्वारे अवैध ठरला. नंतर बदली खेळाडू डॉनियल मालेन याच्या दोन गोलमुळे नेदरलँड्सच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. त्याने अनुक्रमे 83व्या व 90+3व्या मिनिटास गोल नोंदवून डच संघाला सोळा वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठून दिली.

Exit mobile version