प्रचारसाहित्यांना मागणी वाढली; हॉटेल, मंडप डेकोरेटर्सच्या हाताला काम
| रायगड | खास प्रतिनिधी |
लोकसभा मतदारसंघात प्रचाराला आता चांगलीच रंगत आली आहे. प्रचारासाठी आवश्यक असणार्या साहित्याला मागणी वाढली आहे. प्रचारसभा, रॅली, जेवणावळींमध्ये वाढ झाल्याने बाजारात लाखो रुपयांच्या उलाढालीने काही प्रमाणात उसळी घेतल्याचे चित्र आहे. लोकसभा मतदारसंघ निवडणूक-2024 अंतर्गत सर्व उमेदवारांच्या निवडणुकीच्या प्रचार व इतर बाबींसाठी केलेल्या खर्चाची तपासणीची पहिली बैठक निवडणूक खर्च निरीक्षक धीरेंद्रमनी त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीला 13 उमेदवारांपैकी 11 उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र काढण्यात आलेल्या बँक खात्यातून खर्च न करता काही खर्च रोखीने केलेला आहे अशा उमेदवारांना प्रशासनाकडून नोटीस देण्यात आलेल्या आहेत. तसेच अनंत पद्मा गीते व अनंत बाळोजी गीते हे अपक्ष उमेदवार सदर बैठकीसाठी अनुपस्थित होते. त्या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे.
उमेदवारांनी (दि.22) एप्रिलअखेर निवडणूक प्रचारासाठी केलेल्या खर्चाचा तपशील प्रशासनाला सादर केला आहे. त्यामध्ये काही प्रमाणात तफावत होती. प्रशासनाने चूक लक्षात आणून दिल्यावर उमेदवारांनी ती मान्य करत सुधारणा केली. उमेदवाराचे नाव, पक्षाचे नाव, उमेदवाराचा अंतिमतः मान्य खर्च रक्कम असा दिला आहे. सुनील दत्तात्रेय तटकरे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 21 लाख 92 हजार 104 रुपये, अनंत गंगाराम गीते-शिवसेना (उ.बा.ठा.) 6 लाख 76 हजार 920 रुपये, कुमुदिनी रवींद्र चव्हाण वंचित बहुजन आघाडी 86 हजार 920 रुपये, कर्नल प्रकाशराव चव्हाण भारतीय जवान किसान पार्टी 25 हजार 710 रुपये, अजय उपाध्ये अपक्ष 25 हजार 100 रुपये, अमित श्रीपाल कवाडे अपक्ष 29,700रुपये, अंजनी अश्विन केळकर अपक्ष 27,100 रुपये, मंगेश पद्माकर कोळी अपक्ष 25,160 रुपये, पांडुरंग दामोदर चौले अपक्ष 25,100 रुपये, नितीन जगन्नाथ मयेकर अपक्ष 25,100 रुपये, श्रीनिवास सत्यनारायण मट्टपती अपक्ष 27,730 रुपये, अनंत पद्मा गीते अपक्ष 25,100 रुपये, अनंत बाळोजी गीते अपक्ष 25,100 रुपये इतका खर्च केला आहे. आता टोप्या, झेंडे, बॅनर, बिल्ले, पुष्पगुच्छ, मंडप डेकोरेटर्स, हॉटेल व्यावसायिकांना काम वाढले आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार उमेदवारांच्या प्रचारासाठी केलेल्या खर्चाची तपासणी किमान तीन वेळा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार, यानंतरची दुसरी तपासणी दिनांक 30 एप्रिल रोजी आयोजित केली जाणार आहे. जिल्हा नोडल अधिकारी, (खर्च) राहुल केशव कदम, जिल्हा खर्च संनियंत्रण समिती सदस्य, तसेच सर्व विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक खर्च निरीक्षक आपल्या पथकासह उपस्थित होते.
निवडणुकीसंदर्भातील प्रिंटींगची कामे सुरु आहेत. राजकीय पक्षांचे झेंडे, टोप्या, बिल्ले असे साहित्य त्या-त्या उमेदवारांना पक्षाकडून उपलब्ध होते. मंडप डेकोरेटर्स, हॉटेल व्यावसायिक, हार-फूल विक्रेते यांना काही प्रमाणात काम उपलब्ध होत आहेत. आचारसंहिता सुरु असल्याने शुभेच्छा बॅनर छापायचे की नाही, अशी भीती काही ग्राहकांमध्ये आहे.
सुधीर आग्रावकर,
उद्योजक