जिल्ह्यातील 31 हजार 873 विद्यार्थी देणार परीक्षा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या इयत्ता 12 वीच्या (उच्च माध्यमिक) परीक्षा शुक्रवार (दि.4) पासून जिल्ह्यातील 190 परीक्षा केंद्रांवर सुरु होत आहेत. यावेळी कॉपी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आठ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षा निर्भय आणि मोकळ्या वातावरणात होण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग सर्व तयारीनिशी सज्ज झाला आहे. या परीक्षेला एकूण 31 हजार 873 विद्यार्थी बसले असल्याची माहिती जिल्हा परिषद मध्यामिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथं केंद्र असणार आहे. याचा मुख्यत्वे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. जिल्ह्यात 16 परीक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षा 46 मुख्य परीक्षा केंद्र व 144 उपकेंद्रांवर पार पडेल. 15 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा त्याच कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. तर 15 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा मुख्य परीक्षा केंद्र किंवा उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे.