डझनभर ग्रामपंचायत सदस्य अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश निर्गमित
| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यात दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीचा खर्च उमेदवारांना 30 दिवसांच्या आत तहसिलदारांकडे सादर करणे आवश्यक होते. परंतु, मुदतीत खर्च सादर न केल्याने चरईखुर्द आणि तळेगाव येथील निवडणूक लढविलेल्या 12 उमेदवारांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहाण्यास व पुढील पाच वर्ष निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश निर्गमित केला आहे.
तळा तालुक्यातील चरईखुर्द व तळेगाव या ग्रामपंचायतींसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीचा निकाल घोषित झाल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक होते. त्यानुसार प्रतीक्षा सकपाळ, लक्ष्मण भोईर, मंगेश तांबे, हर्षदा भोईर या चरईखुर्द ग्रामपंचायतीतील उमेदवार व सुवर्णा तळेगावकर, सविता जागुष्टे, सुशील पाशिलकर, रमेश महाडिक, प्रियांका पाशिलकर, लक्ष्मी महाडिक, कुंदा शेलार, साक्षी चाळके या तळेगाव ग्रामपंचायतीच्या उमदेवारांनी आपले खर्चाचे हिशोब सादर केले नाही. त्यामुळे या उमेदवारांना अपात्र ठरविण्यासाठी लेखी अर्ज करण्यात आले होते. याबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश निर्गमित केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाचे आदेश व मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार निवडणूक लढविलेल्या या उमेदवारांना आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरीता ग्रामपंचायत सदस्य, व सरपंच राहण्यास किंवा इतर निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्ष हे उमेदवार निवडणूक लढवू शकणार नाहीत.
तसेच, गिरणे व निगुडशेत या ग्रामपंचायतीसाठी देखील मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. या ग्रामपंचायतीत खर्चाचा तपशील न देणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्यासाठी लेखी अर्ज करण्यात आला होता. परंतु, हा अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे गिरणे आणि निगुडशेत ग्रामपंचायतीतील सदस्यांवरील टांगती तलवार हटली आहे. प्रशासनाने हा निकाल लावण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी घेतला, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, चरईखुर्द ग्रामपंचायतीमध्ये सरपंच प्रवीण अंबार्ले यांना मोठा दणका बसला असून त्यांची ग्रामपंचायत अल्पमतात आली असल्याने प्रशासन कोणती पाऊले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.







