घरांसह गुरांच्या गोठ्यांची पडझड; नुकसानग्रस्तांना भरपाईची प्रतिक्षा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून अलिबागसह बारा तालुक्यांना पावसाचा जबर फटका बसला आहे. दिवसभर पाऊस सुरू राहिल्याने अनेक घरांसह गोठ्यांची पडझड झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठी वित्तहानी झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये महाड, पोलादपूर, माथेरान, खालापूर, कर्जत, माणगांव व पनवेल या ठिकाणी शंभर मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडला असून अन्य तालुक्यात 65 मि.मी. पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामध्ये अलिबाग तालुक्यातील ताडवागळे, चरी येथील आदिवासीवाडी, महाजने दिवीवाडी येथील 12 हून अधिक घरांसह गोठ्यांची पडझड झाली आहे. रोहामध्ये बाळसई येथील घरांचे नुकसान झाले आहे. सुधागड पालीमध्ये झालेल्या अतिवृष्टीत महागाव, दर्यागाव येथील घरांसह गुरांचे गोठे, माणगावमधील साई, सोमजाई नगर, खरवली, तळामधील रोवळे, बेलघर, मेढा येथील घरांसह गोठे तसेच मुरूडमधील 32 घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. खालापूरमधील शिवगांव, बिडखुर्द, घोडीवलील, होराळे, पनवेलमधील देवीचापाडा, पाले खुर्द, पोलादपूरमधील आडावळे खुर्द येथील घरांचे नुकसान झाले आहे. आपटा गावातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील विद्यूत उपकरणे व धान्यांचे नुकसान झाले आहे. तसेच, माणगांवमधील वाढवण येथील बैल पाण्यात बूडून मृत झाल्याची घटना घडली असून या पावसात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तातडीने करावे, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे.
344 नागरिकांचे स्थलांतर
रायगड जिल्ह्यामध्ये मागील 24 तासात पावसाचा जोर वाढला असून या पावसाचा फटका मुरूड, पेण, तळा, पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त व पुरग्रस्त गावांना बसला आहे. यावेळी अकरा कुटूंबातील 344 नागरिकांचे 11 ठिकाणी स्थलांतर करण्यास प्रशासनाला यश आले आहे. उर्वरित 36 कुटूंबातील 131 नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरीत केल्याची माहिती देण्यात आली आहे.
19 धरणे फुल्ल
रायगड जिल्ह्यात लघू पाट बंधारे विभागाच्या अखत्यारित 28 धरणे आहेत. या धरणांमार्फत रायगड जिल्ह्यासह नवी मुंबईतील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे या धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 19 धरणे फुल्ल झाली आहेत. अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून इतर नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा कमी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.