वारंवार जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन नगरपरिषदे कडून शहरात पाणीपुरवठ्यासाठी रानवली धरणावर चोवीस कोटी रुपये खर्चीत आधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला असून, सदरचा प्रकल्प सौर ऊर्जेवर चालवला जात आहे. 2023 मध्ये कार्यान्वित झालेल्या या प्रकल्पाद्वारे शहराला शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचा प्रयत्न आहे. रानवली धरण ते श्रीवर्धन या आठ किलोमीटर अंतरावर उच्च घनतेच्या पॉलिथिलीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.
श्रीवर्धन येथे साधारण 2700 नळ ग्राहक असून जलशुद्धीकरण प्रकल्प लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यावर ग्राहकांना शुद्ध पाणी येणे अपेक्षित होते. परंतु, अनेकदा अशुद्ध पाण्याचा पुरवठा तसेच काही दिवसातच पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला काही अंतरावर चार ते पाच फुटी तडे जात असल्याने वारंवार पाणी पुरवठा बंद करण्यात येत असून, नळ ग्राहकांची गैरसोय होतांना दिसते. जलवाहिनी वारंवार फुटल्याने पाणी वाया जात असून, श्रीवर्धन नगरपरिषदेचे जलशुद्धीकरण प्रकल्पात चोवीस कोटी रुपये पाण्यात गेल्याची टिका ग्राहकांकडून होत आहे.
पाणीपुरवठा योजना निविदा व डिझाइन प्रमाणे केली आहे. जेव्हा पाणीपुरवठा योजना आमच्याकडे चालवायला होती, तेव्हा योजना सुरळीतपणे चालू होती. सद्यस्थितीत गळती का होत आहे याबाबतीत संबंधित कर्मचारी कशी चालवतात व त्यासाठी त्यांना तांत्रिक प्रशिक्षणाची गरज आहे का हे पाहावे लागेल.असा खुलासा रविराज इंडस्ट्रीज कंपनीने केला आहे.
उच्च घनतेच्या पॉलिथिलीन जलवाहिन्या या पाणी वितरणासाठी अत्यंत टिकाऊ, लवचिक आणि गंज-प्रतिरोधक जलवाहिनी आहे, ज्यांचा वापर प्रामुख्याने जल वितरण प्रणालीसाठी केला जातो. या जलवाहिन्यात रासायनिक प्रतिरोधकता आणि हवामानातील बदलांना तोंड देण्याची क्षमता असते, ज्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात.असा दावा केला जातो. परंतु, वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने श्रीवर्धन नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जलवाहिन्या उच्च दर्जाच्या आहेत का, अशी शंका ग्राहक करीत आहेत.
नगरपरिषदे कडून योग्य पाणी पुरवठा होत नसेल तर ग्राहकांनी पाणीपट्टी भरू नये. ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्या वर कारवाई झाली पाहिजे तसेच ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये का टाकू नये.जलवाहिनी फुटल्यावर हजारो लीटर पाणी वाया जाते याचा हिशोब ठेकेदार देणार की नगरपरिषद.
-संतोष वेश्वीकर
नगरसेवक, श्रीवर्धन नगरपरिषद.







