। मुंबई । प्रतिनिधी ।
कुर्ला पश्चिम येथील सीएसटी रोडवर ऑटोमोबाईल्सच्या सुट्या भागांचा साठा असलेल्या गाळ्याला आग लागल्याची घटना रविवारी (दि.12) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सदर आग भडकल्याने आजूबाजूचे 20 गाळे या आगीत जळून खाक झाले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथील सीएसटी रोड कपाडिया नगर, गुरुद्वारा येथे ऑटोमोबाईल्सचे सुटे भाग, टायर, इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, स्क्रॅप मटेरियल आणि इतर साहित्य इत्यादींचा साठा असलेले अंदाजे 3000 चौरस फूट क्षेत्रफळाचे बैठे, एकमजली गाळे आहेत. या गाळ्यांपैकी एका गाळ्यात मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग टायर, इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, स्क्रॅप मटेरियल आणि इतर ज्वलनशील साहित्यांमुळे भडकली आणि पसरली. त्यामुळे अंदाजे 15 ते 20 गाळ्यांमध्ये ही आग पसरली. परिणामी सदर गाळे जळून खाक झाले. या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.
या भीषण आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम हाती घेतले. तसेच, गाळ्यांना लागलेल्या आगीची माहिती मिळताच गाळेधारक, मालकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान, आगीची भीषणता पाहता अग्निशमन दलाच्या जवानांनी मध्यरात्री 2.43 वाजता आग स्तर – 1 ची आणि त्यानंतर मध्यरात्री 2.57 वाजता आग स्तर – 2 ची असल्याचे जाहीर केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून सदर आगीवर चार फायर इंजिन, दहा जंबो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने या भीषण आगीवर पाच तासांनी नियंत्रण मिळविले आणि सकाळी साडे सात वाजता आग संपूर्णपणे विझविली. त्यानंतर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि गाळे धारक यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, ही आग का आणि कशी काय लागली, आगीचे नेमके कारण काय याबाबत स्थानिक पोलीस , अग्निशमन दलाचे जवान हे अधिक तपास करून माहिती घेत आहेत.







