16 जखमी झाले असून चार जणांची प्रकृती गंभीर
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील इंदापूर बायपासजवळील कशेणे गाव परिसरात पहाटे भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला बसलेल्या सुमारे 20 प्रवाशांना भरधाव कारने चिरडले. यात 16 जण जखमी झाले असून त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना तातडीने मुंबई येथे हलविण्यात आले आहे. ही दुर्घटना शनिवारी (दि.28) पहाटे सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
कोकणातून मुंबईकडे निघालेल्या एका लक्झरी बसचा टायर पंक्चर झाल्याने चालकाने वाहन महामार्गाच्या कडेला उभे केले. बसमधील सुमारे 40 प्रवासी खाली उतरले होते. काही प्रवासी रस्त्याच्या कडेला बसले होते, तर काहीजण बाजूला उभे राहून टायर बदलण्याची प्रतीक्षा करत होते. याचवेळी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने अचानक नियंत्रण गमावून रस्त्याच्या कडेला बसलेल्या प्रवाशांवर जोरदार धडक दिली. बेसावध असलेल्या प्रवाशांना काही समजण्याआधीच कार अंगावर आल्याने आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. पहाटेच्या अंधारात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघातात काही प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. या अपघातात जयहरी गोविंद मालप (वय 56, रा.मुंबई), स्वरूप सुदर्शन केंद्रे (वय 13, रा.वरळी-मुंबई), सुमीथी सुदर्शन केंद्रे (वय 38, रा. वरळी मुंबई), बबन विठोबा देवळे (वय 55), रा. महाड), निशांत बबन देवळे (वय 27, रा.महाड), सुप्रिया सुनील केंद्रे (वय 44, रा.कांदिवली मुंबई), पूजा सुरेश येलकर (वय 26, रा.महाड), कस्तुब शशिकांत लांबे (वय 16, रा.मंडणगड), सुरेश सखाराम येलकर (वय 56, रा.महाड), जान्हवी विवेक रेशीम (वय 36, रा.म्हाप्रळ-मंडणगड), निर्मला रामदास सातगोडे (वय 53, रा.विरार पालघर), प्रगती हिरलेकर (वय 35, रा.म्हाप्रळ- मंडणगड), साहिल केंद्रे (वय 18, महाड), सेजल केंद्र (वय 20, रा.महाड), देवांक निलेश रेशीम (वय 17, रा.म्हाप्रळ- मंडणगड), श्रावणी विवेक रेशीम (वय 18, रा.म्हाप्रळ- मंडणगड) हे जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने माणगाव येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असलेल्या चार जखमींना अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी उसळली होती.
घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख विपुल उभारे आणि शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यांनी जखमींना धीर देत त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती दिली. आपत्कालीन सेवांनी तत्परता दाखवत रुग्णांना तातडीने उपचारासाठी हलविले. सध्या होळी सणानिमित्त कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे. मुंबई-गोवा महामार्ग वर माणगाव, इंदापूर आणि लोणेरे परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही चिंताजनक बनले आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहन चालविताना वेगमर्यादा पाळणे, वाहन सुरक्षित अंतरावर उभे करणे आणि रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या अपघाताबाबत माणगाव पोलीस ठाणे अधिक तपास करत असून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पहाटेच्या या भीषण अपघाताने अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सणाच्या आनंदावर काळी छाया पडली आहे. महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






