ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धा

पाकिस्तानच्या सहभागाविषयी संदिग्धता

| लाहोर | वृत्तसंस्था |

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सहभागाबद्दल अद्याप संदिग्धताच बाळगण्यात येत आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतल्यानंतर सहभागाविषयी शुक्रवार किंवा सोमवारपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले.

पंतप्रधान शरीफ यांची भेट घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अलीकडेच बांगलादेश क्रिकेट संघाबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सर्व पर्याय खुले ठेवून हा प्रश्न निकालांत काढण्याचे आश्वासन दिल्याचे नक्वी यांनी सांगितले. यासाठी शुक्रवार किंवा सोमवारपर्यंत निर्णय घेण्यावर आमच्या दोघांचेही एकमत झाल्याचे नक्वी यांनी म्हटले आहे.

पूर्ण बहिष्कार अशक्य
नक्वी आणि पंतप्रधान शरीफ यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सहभागाबाबत बहिष्कारासंदर्भात असलेल्या पर्यायांबाबत विचार करण्यात आला. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पूर्ण स्पर्धेवर बहिष्कार किंवा निषेध म्हणून 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा सामना खेळण्यास नकार देणे या पर्यायांंचा विचार केला जात आहे. अर्थात, पीसीबीने या संदर्भात सार्वजनिकपणे कुठलीही टिप्पणी किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही. नक्वी यांनी बहिष्काराची भूमिका घेतल्यानंतर चोवीस तासांत पाकिस्तान संघाची घोषणा केली. त्या वेळी निवड समिती प्रमुख अकिब जावेद यांनी संघाचा सहभाग सरकारच्या आदेशावर अवलंबून असेल, असे सांगितले.

आयसीसी अनभिज्ञ
पाकिस्तानच्या बहिष्काराची नोंद आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतली असली, तरी सहभागाचा निर्णय घेण्यासाठी घेतलेल्या कालावधीबाबत आयसीसी अनभिज्ञ असल्याचे समजते. आयसीसीने पुढील आठवड्यापर्यंत निर्णय लांबविल्यास सर्वच प्रक्रियेला उशीर होणार आहे. कारण पाकिस्तानचा स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना 7 फेब्रुवारी रोजी कोलंबोत नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे.

पाकिस्तानचा विरोध का?
पर्यायी केंद्रावर खेळण्याचा प्रस्ताव धुडकाविल्यानंतर बांगलादेशने विश्वचषक स्पर्धेत भारतात खेळण्यास नकार दिला. त्यांच्या या निर्णयानंतर आयसीसीने बांगलादेश संघाला थेट स्पर्धेतून वगळले. त्यांच्या जागी स्कॉटलंडला प्रवेश दिला. हा निर्णय म्हणजे आयसीसी भारताच्या बाबतीत दुहेरी मापदंड वापरत असल्याची टीका पीसीबीने केली आहे. अशीच भूमिका असेल, तर पाकिस्तानच्या सहभागावरही शंका उपस्थित व्हायला हवी, असे नक्वी यांचे म्हणणे होते. बांगलादेशवर हा अन्याय आहे. प्रत्येक वेळेस बीसीसीआय सांगेल तसे होत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही.
आम्हाला जर कोलंबोत खेळण्याची परवानगी मिळते, तशी ती बांगलादेशलाही मिळायला हवी, अशी भूमिका पीसीबीने घेतली. विशेष म्हणजे आयसीसी मंडळाच्या बैठकीत देखील 45 सदस्यांपैकी केवळ पाकिस्तानने बीसीबीच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता.

पाकचे क्रिकेट पणाला नको
बांगलादेश क्रिकेट संघाला पाठिंबा व्यक्त करण्यापर्यंत ठीक आहे. मात्र, त्यासाठी पाकिस्तानातील क्रिकेट पणाला लावू नये आणि ङ्गआयसीसीफशी असलेले संबंध बिघडण्यापासून दूर रहावे असे मत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान मंडळातील माजी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी स्पर्धेतून माघार घेतल्यास आयसीसीबरोबरचे संबंधही बिघडणार आहेत आणि भविष्यात त्याचे परिणाम होण्याची भीती देखील व्यक्त होत आहे. पाकिस्तान सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे.
बांगलादेश आयसीसीच्या निर्णयाला आव्हान देणार नाही, मग बहिष्कार ही भूमिका घेऊन आपण पाकिस्तानातील क्रिकेट का पणाला लावत आहोत, असाच सूर माजी कर्णधार इंझमाम उल हक, मोहसीन खान, हरुन रशीद यांच्यासह पीसीबीचे माजी पदाधिकारी यांनी आळवला आहे.

Exit mobile version