कशेडी घाटामध्ये एकाच रात्री दोन अपघात

दोघेजण ठार, तर अन्य किरकोळ जखमी
| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर कशेडी घाटामध्ये शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पहाटे दोन अपघात झाले. त्यामध्ये मध्यरात्री झालेल्या पहिल्या अपघातात दोन जण ठार, तर एक जखमी झाला, तर पहाटे झालेल्या दुसर्‍या अपघातात कोणीही जखमी झाले नसून, दोन्ही अपघातात चारही वाहनांची मोठ्या प्रमाणात मोडतोड होऊन हानी झाली आहे.

शनिवार, दि.30 एप्रिल रोजी पावणेएक वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील भोगावजवळीत संत तुकाराम मंदिराशेजारी मुंबई दिशेकडून वाशी-नवी मुंबई ते देवगड दिशेकडे जाणारी बोलेरो पिकअप (क्र.एम.एच.07-एजे-2187) व जयगड ते ठाणे-मुंबईकडे जाणारा ट्रक (क्र. एमएच 04 एफपी-2287) यांच्यात समोरासमोर ठोकर होऊन अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कशेडी टॅप वाहतूक पोलीस टॅपचे पोलीस उपनिरीक्षक ए.पी. चांदणे आणि स्टाफ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अपघातातील दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरात ठोकर झाली होती. यामध्ये बोलेरो पिकअप जीपमधील तुषार प्रकाश चव्हाण (24, रा. नारिंग्रे, ता. देवगड) आणि निलेश मनोहर शेट्ये (36, रा. मुणगे, ता. देवगड) हे गंभीर दुखापत होऊन जागीच मयत झालेले आहेत. तर, उमेश उत्तम कोरडे (24, रा. देवगड) यांना किरकोळ व गंभीर दुखापत झाली आहे. अपघातातील दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अपघातस्थळी अपघातातील दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत चालू करण्यात आली आहे.

याप्रकरणी महाडचे डीवायएसपी निलेश तांबे आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे एपीआय प्रशांत जाधव यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट दिली. मृतदेह पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये हलविण्यात आले, तर पोलीस हवालदार संदीप शिरगांवकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी तुषार प्रकाश चव्हाण या मयत चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशेडी घाटातील दुसर्‍या अपघातात वाहनांचे नुकसान
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात शनिवार, दि.30 एप्रिल रोजी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास इको कार व आयशर टेम्पो यांचा अपघात झाल्याचे समजल्यावर कशेडी टॅप वाहतूक पोलीस टॅपचे पोलीस उपनिरीक्षक ए.पी. चांदणे हे स्टाफसह घटनास्थळी तातडीने रवाना झाले. यावेळी आयशर टेम्पो क्रमांक एम.एच.08 एम 1298 वरील चालक कासीम युसुफ बोट (49, रा.सुरळ ता.गुहागर) हा विक्रोळी ते चिपळूण असा चालवत घेऊन जात असता आयशर टेम्पोचा जॉईंट तुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून त्याच्यापुढे जाणारी इको कार क्रमांक एम.एच.03-झेड-2484 हिला जोराची धडक बसून ईको गाडी चालक हेमंत दत्ताराम ब्रीद (21, रा. तांबेडी, सध्या रा. कुंवारबाव, ता.जि. रत्नागिरी) यांच्यासह कार फेकली जाऊन रस्त्याचे बाजूला जाऊन पलटी झाली. आयशर टेम्पो रस्त्याच्या कठड्यावर एका कुशीवर जाऊन पलटी झाला असून, अपघातात दोन्ही वाहनांमधील इसमांना कोणत्या प्रकारच्या दुखापती झालेल्या नाहीत. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आल्याची माहिती ए.पी. चांदणे यांनी दिली.

Exit mobile version