चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक

गुहागर पोलिसांची दमदार कारवाई

| गुहागर | प्रतिनिधी |

गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील जानकी फार्म हाऊसमधून ‌‘विक्रम‌’ कंपनीच्या 45 सौरऊर्जा पॅनलची चोरी झाल्याचा प्रकार गुहागर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी साताऱ्यातून दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच, चोरीला गेलेला सुमारे 9 लाख 45 हजार रुपये किमतीचा 100 टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दि. 15 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत वेलदूर येथील जानकी फार्महाऊसच्या मोकळ्या व्हरांड्यातून हे पॅनल चोरीला गेले होते. याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी एक विशेष पथक तयार केले. या पथकाने संशयित व्यक्तींचा कसून मागोवा घेत तपास केला असता सातारा येथील अतुल अंबादास थोरात याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. चौकशीत आरोपी अतुल थोरात याने चोरलेला सर्व मुद्देमाल त्याचा मित्र आणि सह-आरोपी अतुल सोमनाथ चौधरी (रा. खातगुण, ता. खटाव) याच्या मदतीने एका चारचाकी गाडीतून साताऱ्यात नेल्याची कबुली दिली. त्यांनी हा मुद्देमाल सातारा जिल्ह्यातील खातगुण, भांडेवाडी, गणपतीचा माळ या भागातील वन खात्याच्या जागेत लपवून ठेवला होता.

गुहागर पोलिसांनी तातडीने साताऱ्यात जाऊन दोन्ही आरोपींना अटक केली आणि सुमारे 9 लाख 45 हजार रुपये किमतीचे सर्व 45 सौरऊर्जा पॅनल जप्त केले. या कारवाईमुळे चोरीस गेलेला 100 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुहागर पोलीस अधिक तपास करत आहेत. या यशस्वी कारवाईमुळे गुहागर पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Exit mobile version