| मुंबई | प्रतिनिधी |
गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील कोकणवासीयांनी गावची वाट धरली आहे. रेल्वेगाड्यांना कोकणवासियांची गर्दी होऊ लागल्याने गर्दीचे विभाजन करण्यासाठी मध्य रेल्वेने दिवा -सावंतवाडी एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढविली आहे. दिवा -सावंतवाडी एक्स्प्रेसला शुक्रवारपासून तृतीय श्रेणीचे दोन वातानुकूलित डबे जोडण्यात आले. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गाडी क्रमांक 10105 दिवा सावंतवाडी एक्स्प्रेसला 16 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत आणि गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी दिवा एक्स्प्रेसला 15 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत तृतीय श्रेणीचे दोन वातानुकूलित डबे जोडण्यात येणार आहेत. यासह 10 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार डबा असणार आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.