संतापजनक! दत्तक घेतलेल्या चिमुकल्यांना मारहाण

। ठाणे । प्रतिनिधी ।

नालासोपारा येथे एक संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी दत्तक घेतलेल्या सात आणि तीन वर्षांच्या चिमुकल्यांना एका दाम्पत्याने अमानुष मारहाण केली आहे. या मारहाणीत एका मुलाचा हात फॅक्चर झाला आहे. शेजार्‍यांनी याबाबत चाईल्ड हेल्पलाइनला माहिती दिली असता या मुलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी विकृत दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पूर्वच्या अग्रवाल नगरी येथील वीणा सरस्वती इमारतीमध्ये सचिन पोरे आणि कविता पोरे हे दाम्पत्य राहतात. त्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये अभिषेक (सात वर्ष आठ महिने) आणि राजेश (तीन वर्ष आठ महिने) या मुलांना दत्तक घेतले होते. मात्र, ते या दोन्ही मुलांना नेहमीच बेदम मारहाण करत असायचे. त्यामुळे मुले जोरजोरात रडायची. त्यांचा आवाज ऐकून शेजार्‍यांनी विचारणा केली असता पोरे दाम्पत्यांनी हा आमचा अंतर्गत प्रश्‍न आहे, तुम्ही यात पडायचे नाही, असे सांगितले जायचे. परंतु, दररोज रात्री मुलांच्या रडण्याचा आणि त्यांना मारहाण केल्याचा आवाज येत असल्याने शेजार्‍यांनी पालघर जिल्हा महिला बालविकास आघाडीच्या 1098 या हेल्पलाइनवर संपर्क करून याबाबत माहिती दिली.

तक्रारीची गंभीर दखल घेत चाईल्ड हेल्पलाइन विभागाच्या पथकाने पोरे दाम्पत्याच्या घरी धडक दिली असता मुले जखमी अवस्थेत आढळली. मुले अभ्यास करत नाहीत म्हणून मारहाण केल्याचे त्यांनी कबुली दिली. याप्रकरणी पोरे दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version