अडीच लाखांचा ऐवज लुटला

| पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील काश्मिरे गावातील बंद घरातून दोन लाख 55 हजार रुपयांचा ऐवज दिवसाढवळ्या लांबविल्याची घटना घडली आहे. फिर्यादी लक्ष्मण कमळ म्हात्रे (49, रा. काश्मिरे,पो. कांदळे पाडा, पेण) यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.24) सकाळी 8 ते दुपारी 3 च्या दरम्यान ते पाटणेेशर येथे सत्यनारायणाच्या पूजेस गेले होते. त्यांची पत्नी योगिता म्हात्रे ही शेतावर गेली होती. यादरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे एकूण 2 लाख 55 हजार रुपयाचे दागिने चोरुन नेले. याबाबत लक्ष्मण म्हात्रे यांनी, पेण पोलीस ठाण्यात तक्रार केली असून अज्ञात चोरट्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

चोरट्याने अंदाजे 5 तोळ्याचे सोन्याचे गंठण (किंमत अंदाजे 1 लाख 50 हजार), दीड तोळ्याचे कानातील सोन्याचे झुमके (किंमत अंदाजे 45 हजार), 1 तोळ्याची सोन्याची चैन (किंमत अंदाजे 30 हजार), 2 ग्रॅम सोन्याच गळ्यातील पान, 2 ग्रॅम गळयातील सोन्याची डवल, 1 ग्रॅम नाकातील सोन्याची नथ (किंमत अंदाजे 30 हजार रुपये) असा एकूण 2 लाख 55 हजार रुपयाचा ऐवज दिवसाढवळ्या चोरट्याने लांबविल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी डॉग स्क्वाड, फिंगरप्रिंट पथक यांनी भेट देऊन नमुने घेतले आहेत.

Exit mobile version