हॉटेल आचार्‍यावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक


| रायगड, खास | प्रतिनिधी |

महाड येथील एका हॉटेलमधील आचार्‍यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची घडना घडली. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केले आहे. शुभम उर्फ राज अनंत तांबे आणि अमृत अनंत तांबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भावे येथील सुमय्या गार्डन बार अँड रेस्टॉरंट या ठिकाणी रविवारी, (दि.24) मार्च दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये आलेल्या दोन तरुणांनी एकमेकांशी वादावादी करून गडबड गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी हॉटेलचे आचारी बाळकृष्ण रामचंद्र साळुंखे (40), रा. तळीये-महाड हे रोखण्यासाठी गेले असता दोन्ही तरुणांनी साळुंखे यांच्यावरच जीवघेणा हल्ला केला. दोन्ही तरुणांनी साळुंखेंवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले.

याबाबत साळुंखे यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार शुभम उर्फ राज अनंत तांबे आणि अमृत अनंत तांबे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने आणि पोलीस उपनिरीक्षक विक्रांत फडतरे हे करीत आहेत.

Exit mobile version