| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील पोयंजे येथे 80 वर्षीय वृद्ध इसमाची हत्या केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सचिन उर्फ शशीभाऊ वाघमारे (वय 35) व धनराज महादू वाघमारे (वय 33, दोन्ही रा.पोयंजे आदिवासी वाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
पोयंजे येथील पांडुरंग मर्या मते यांच्या कपाळावर, चेहर्यावर व डोक्याच्या पाठीमागे वार करून त्यांना ठार मारण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह वाहत्या पाण्यात टाकून दिला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पनवेल तालुका पोलिसांनी विविध पथके स्थापन केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पांडुरंग मते हे रात्रीच्या वेळेस तोंडावर बॅटरीचा प्रकाश मारायचे व सतत शिवीगाळ करायचे. तसेच मते हे शशिभाऊच्या घरी येत असत ते त्याला आवडत नव्हते, त्यामुळे त्यांच्यात भांडण देखील झाले होते. याचा राग मनात धरून लाकडी काठीने मारहाण करून पांडुरंग मते यांना ठार मारले. व त्यांचा मृतदेह वाहत्या पाण्यात टाकून ते पळून गेले. न्यायालयात दोघांना हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.