गोरक्षकांच्या छाप्यानंतर पोलिसांची कारवाई
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील वावे मोहल्ल्यामध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास गोवंश हत्या झाल्याची खबर मिळताच पोलादपूर शहर परिसरातील दहा गोवंश रक्षक तरूणांनी छापा टाकल्याने पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन केलेल्या कारवाईमध्ये दोन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील वावे मोहल्ल्यामध्ये नेहमीच एका घरामध्ये गोवंश हत्या करून गोवंश मांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पाळतीवर असलेल्या दीनेश दरेकर, दीपक उतेकर, राहुल जाधव, जयेश जगताप, सागर साळुंखे, दीपक उमेश पालकर आणि प्रतिक मोहिते या दहा गोवंशरक्षक तरूणांनी रविवारी पहाटेच्या सुमारास छापा घालून पोलादपूर पोलिसांना पाचारण केले. यावेळी तिघेजण गोवंशाची कत्तल करून मांसविक्री करीत असल्याचे निदर्शनास आले.
पोलादपूर पोलिसांनी रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोहोचून घटनास्थळावरून लाकडी मुठ असलेला सुरा, लागडी गोल आकाराचा ओंडका, एक स्टीलची बादली, एक पांढर्या रंगाचा मळकट प्लास्टीकचा मग, एक निळया व सिल्व्हर रंगाचा मेणकापडाचा तुकडा, एक पिवळया रंगाची नायलॉनची रस्सी, दोन निळ्या रंगाचे प्लास्टीकचे पिंप, एका तांबड्या रंगाच्या गोवंश नरजातीचे कापून ठेवलेले मांसाचे पाच तुकडे असा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलादपूर पोलीसांनी याप्रकरणी घटनास्थळावरून अब्दुल करीम अलिमिया तांबे (52), फैज इस्माईल काझी (45) आणि तरूण या तिघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी फिर्यादी दीनेश दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यापैकी अब्दुल करीम अलिमिया तांबे आणि फैज इस्माईल काझी या दोघांविरूध्द दखलपात्र गुन्हा दाखल करून अटक केली. यावेळी एका प्रभावी व्यक्तीच्या मध्यस्थीने एका तरूणाची अटक टळल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलादपूर तालुक्यात गोवंश हत्या बंदीसाठी मोठ्या प्रमाणावर केले जाणार असून, नजिकच्या काळात मांसविक्रीच्या उद्देश्याने हत्येसाठी दिल्या जाणार्या जनावरांचे मालकही या गोवंश रक्षकांच्या रडारवर येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.